महाराष्ट्रात कुठे मुसळधार? कुठे पावसाची विश्रांती? रविवारी घराबाहेर पडण्याआधी जाणून घ्या अपडेट

Maharashtra Weather Update:  महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये हवामान विभागाने विविध अलर्ट जारी केले आहेत. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Pravin Dabholkar | Updated: Aug 4, 2024, 07:48 AM IST
महाराष्ट्रात कुठे मुसळधार? कुठे पावसाची विश्रांती? रविवारी घराबाहेर पडण्याआधी जाणून घ्या अपडेट title=
महाराष्ट्र पावसाची अपडेट

Maharashtra Weather Update: पावसाचे दिवस आणि त्यात रविवारची सुट्टी असं समिकरण जुळून आल्याने बहुतांशजण सुट्टी एन्जॉय करण्यासाठी घराबाहेर पडतील. अनेकजण घरी राहूनची सुट्टी घालवणे पसंत करतील. अशावेळी तुम्ही ज्या जिल्ह्यात राहताय किंवा ज्या ठिकाणी जाणार आहात, तिथे किती पाऊस कोसळणारेय, हे आधीच माहिती करुन घ्या. अन्यथा ऐनवेळी तुमचे प्लानिंग गडबडू शकते. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये हवामान विभागाने विविध अलर्ट जारी केले आहेत. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

मध्य महाराष्ट्राला हवामान विभागाने आज रेड अलर्ट जारी केलाय. मुसळधार  ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. पालघर, पुणे, साता-यात रेड अलर्ट आहे. तर मुंबईतही आज पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.  मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिधुदुर्ग, रायगड, नाशिक,  या ठिकाणी ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने वर्तवलाय. तर नागपूरमध्ये येलो अलर्ट आहे. हवामान खात्याकडून मध्य महाराष्ट्राला रेड अलर्ट जारी करण्यात आल्यानंतर येथील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईतही जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

रायगडमध्ये जोरदार सरी

रायगड जिल्ह्याच्या उत्तर भागात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. अलिबाग, पेण , कर्जत, खालापूर, खोपोली भागात अधून मधून पावसाच्या जोरदार सरी कोसळतायत. दक्षिण रायगड जिल्ह्यात मात्र पावसाने विश्रांती घेतल्याचे पाहायला मिळतंय.

पुणे जिल्ह्यात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट 

पुणे जिल्ह्यात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. पुण्यात उपनगरासह घाटमाथ्यावरपावसाचा जोर कायम आहे. विशेष करून धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस आहे.त्यामुळे खडकवासला धरणातून २७०१६ कयूसेक विसर्ग सोडण्यात आलाय तर भाटघर धरणातून १९०१२कयूसेक ने विसर्ग सुरू आहे. पुण्यात घाटमाता आणि धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने डेक्कन परिसरातील नदीच्या पाणीपातळीत वाढ झालीये.सिंहगड रस्त्यावरील एकतानगरीमध्ये दोन सोसायटीमध्ये पुराचे पाणी शिरलेलं पाहायला मिळतंय. सुरक्षेच्या कारणास्तव पुलाची वाडी, प्रेमनगर तसंच एकतानगरीमधील वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

मुळशी तालुक्यातील चाळीस गावांना सिंचन तसेच पिण्याचे पाणी व औद्योगिक क्षेत्राला पाणी पुरवठा करणारे मुळशी धरण शंभर टक्के भरले. मुळशी धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असून धरणात पाणी पातळी नियंत्रणात आणण्यासाठी धरणाच्या सांडव्यावरून मुळा नदी पात्रामध्ये 24 हजार 745 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तरी मुळशी मधील नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा मुळशी टाटा धरण प्रशासनाने दिला आहे.

जुन्या मुंबई पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी

पुण्याहून मुंबई कडे तसेच मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर पनवेलच्या भिंगार वाडी ते पळस्पे फाटा दरम्यान वाहतूक कोंडी विकेंड, पावसाळी पर्यटन यामुळे महामार्गावर वाहनांची संख्या वाढलेली दिसतेय. नवी मुंबईत मध्यरात्रीपासून पावसाची संततधार आहे. सध्या अधूनमधून जोरदार सरी बरसताना दिसतायत.