Maharashtra Weather News : मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू असतानाच राज्यात वरुणराजाचं वेगळं रुप पाहायला मिळत आहे. कधी तो रुद्रावतारात दिसतो, तर कधी शांतपणे त्याची बहरसात सुरू असल्याचं पाहायला मिळतं. असा हा पाऊस येत्या 24 तासांमध्ये राज्यातील सातारा, पुणे आणि सिंधुदुर्गावर परिणाम करताना दिसेल.
पण, इथं पावसाचा जोर कमी असल्यामुळं वीजांच्या कडकडाटासह ढगांचा गडगडाट पाहता नेमकं काय सुरुय, असाच प्रश्न उपस्थित होत आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार येत्या काही दिवसांसाठी राज्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, परतीच्या पावसाच्या धर्तीवर हा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सातारा आणि सांगली इथं ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची हजेरी असेल असं हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. यादरम्यान ताशी 30 ते 40 किमी वेगानं वारे वाहणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
राज्यात सध्या ऑक्टोबर हिटचा तडाखा वाढल्यामुळं विदर्भापासून मुंबईपर्यंत उष्णतेचा दाह दिवसागणिक वाढताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून विदर्भात सातत्यानं तापमान 35 अंशांच्या टप्प्यात पाहायला मिळालं आहे. नैऋत्य मान्सून वाऱ्यांनी महाराष्ट्रातून काढता पाय घेतल्यानंतर आता नंदुरबारपर्यंत मान्सूननं माघारर घेतली आहे. पण, अद्यापही काही भागांवर कमी दाबाच्या क्षेत्राचे परिणाम दिसत असून, इथं पावसाच्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पुढील 24 तासांसाठी कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअस इतकं असेल. आभाळ अंशत: ढगाळ राहणार असून, नवी मुंबई आणि पश्चिम उपनगरांमध्ये आकाश निरभ्र असेल. शहरात तूर्तास पावसाची शक्यता नसल्याचंही हवामान विभागाच्या वतीनं स्पष्ट करण्यात येत आहे. दरम्यान येत्या काही दिवसांमध्ये उष्णतेचा दाह सातत्यानं वाढणार असून, त्यामुळं अनेकांचीच होरपळ होणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.