Maharashtra Weather News : चिंता वाढली! मान्सून जितक्या वेगानं आता तितक्याच वेगानं....

Maharashtra Weather News : पावसाचा यलो अलर्ट लागू करण्यात आलाय खरा, पण हा मान्सून आहे तरी कुठं? पावसाचं घटललें प्रमाण पाहून अनेकांच्या चिंतेत भर   

सायली पाटील | Updated: Jun 17, 2024, 06:43 AM IST
Maharashtra Weather News : चिंता वाढली! मान्सून जितक्या वेगानं आता तितक्याच वेगानं....  title=
Maharashtra Weather News monsoon slowdowns mumbai konkan temprature increases latest rain updates

Monsoon Updates : मागील 48 तासांपासून राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसापेक्षा उन्हाळी वातावरणाचीच जाणीव झाल्याचं पाहायला मिळालं. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये तर, प्रतंड उकाडा जाणवू लागला. रायगड जिल्ह्यातील पनवेल, अलिबागपर्यंत काहीशी अशीच स्थिती असल्यामुळं शेतीच्या कामांची सुरुवात करण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकरी वर्गाची चिंता आता वाढली आहे. 

यंदाच्या वर्षी नैऋत्य मोसमी वारे, अर्थात मान्सूननं देशात निर्धारित वेळेआधीच हजेरी लावली. ज्यानंतर पहिल्या आठवड्यात तो मनसोक्त कोसळला. पण, त्यानंतर मात्र मान्सूनचा वेग मंदावताना दिसता. सध्या दक्षिण भारतामध्ये पावसाची संततधार तर, काही भागांमध्ये कोसळधार सुरु असलीही तरीही, महाराष्ट्रात मात्र त्याचा जोर ओसरल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक भागांमध्ये तर ढगाळ वातावरण नसल्यानं प्रखर सूर्यप्रकाश आणि उष्णतेचा दाह अधिक अडचणी वाढवताना दिसत आहे. 

हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या कोकण किनारपट्टीपासून थेट विदर्भापर्यंत सक्रिय असणाऱ्या मान्सूनचा जोर काही अंशी कमी झाला असून, त्यामुळं तापमानाच किमान तीन ते चार अंशांनी वाढ होऊन हा आकडा काही भागांमध्ये 35 ते 40 अंशांच्या घरात पोहोचला आहे. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सून वारे पोहोचले नसले तरीही तापमानवाढीमुळे बाष्पीभवनाच्या प्रक्रियेतून ढगांच्या गडगडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. हवामानाच्या याच स्थितीच्या धर्तीवर सध्या मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

हेसुद्धा वाचा : भारतीयांची स्वप्नपूर्ती! ढगांवर तरंगणाऱ्या चिनाब पुलावर रेल्वेची यशस्वी ट्रायल; रेल्वे मंत्र्यांनी शेअर केला व्हिडिओ

 

हवामानाच्या अंदाजानुसार पुढील तीन-चार दिवसांमध्ये मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पर्जन्यमानाचा अंदाज आहे. या काळात अरबी समुद्रातील र्नैऋत्य मोसमी पावसाची शाखा आणखी सक्रि. होणार असून, बंगालच्या उपसागरातील शाखा या आठवड्यात सक्रिय होऊन पुढच्या दिशेनं वाटचाल सुरु करेल असा अंदाज आहे. ज्यामुळं आता पावसाशी गाठभेट थेट 20 - 21 जूनला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिथून पुढं मान्सून संपूर्ण देशभरात सक्रिय होण्याची चिन्हंही दिसू लागतील. 

उत्तर भारतात उष्णतेची लाट 

इथं महाराष्ट्रात मान्सूनची प्रतिक्षा असतानाच तिथं दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये मात्र उष्णतेच्या लाटेनं हाहाकार माजवला आहे. दिल्लीमध्ये अनेक ठिकाणी तापमान 44 ते 45 अंशांच्या घरात असून प्रयागराजमध्ये हा आकडा 47 अंशांपर्यंत पोहोचल्याचं सांगितलं जात आहे. इथं वाढता उकाडा पाहता हवामान विभागानं नागरिक आणि यंत्रणांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचा सल्ला नागरिकांना दिला जात आहे.