Maharashtra Weather News : नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग कमी झाल्यामुळं महाराष्ट्रातील बहुतांश भागांवर दुबार पेरणीचं संकट घोंगावतानाच अखेर वरुणराजानं पुनरागमन केलं आणि शेतकऱ्यांसह अनेकांनाच मोठा दिलासा मिळाला. मान्सूनच्या वाटेत असणारे अडथळे आता दूर झाले असून, पाऊस मोठ्या मुक्कामी आल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या कोकण पट्ट्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त सातारा, कोल्हापूरातही जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. (Monsoon)
मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्येही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, यावेळी ताशी 30-40 किमी वेगानं वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भासाठी हवामान विभागानं पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपयाhttps://t.co/jw7yrf9chD भेट घ्या. pic.twitter.com/TDRADR2KtW
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) June 18, 2024
देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये अद्यापही पावसानं हजेरी लावलेली नाही. सध्याच्या घडीला या राज्यांमध्ये उष्णतेचीच लाट अधिक तीव्र होत असून, तापमान 45 ते 46 अंशांच्या घरात असल्याचं पाहायला मिळत आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार 20 जून ते 5 जुलैदरम्यान मान्सून देशात पूर्णपणे सक्रिय होणार असून, बहुतांश राज्यांमध्ये पावसाची जोरदार सुरुवात होणार आहे. यंदाच्या वर्षी केरळात मान्सून तीन दिवस आधीच दाखल झाला. ज्यानंतर मात्र मान्सूनचा वेग मंदावला. सध्या केरळासह तेलंगणा, महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये पावसाची दमदार हजेरी पाहयला मिळणार असून, 20 जून ते 5 जुलैदरम्यान मान्सून उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, दिल्ली, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरसह लडाखपर्यंत पोहोचणार आहे.