Weather News : मुंबईत उन्हाचा लपंडाव; विदर्भ- मराठवाड्यासाठी मात्र हवामानाचा चिंता वाढवणारा अंदाज

Maharashatra Weather News : राज्याच्या आणखी कोणत्या भागात हवामान वाढवणार चिंता? नेमका काय आहे हवामानाचा अंदाज?   

सायली पाटील | Updated: May 6, 2024, 07:43 AM IST
Weather News : मुंबईत उन्हाचा लपंडाव; विदर्भ- मराठवाड्यासाठी मात्र हवामानाचा चिंता वाढवणारा अंदाज  title=
maharashtra weather news heat wave in vidarbha and marathwada

Maharashatra Weather News : राज्यात सध्या हवामानाच्या स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती पाहायला मिळत आहे. तिथं कोकण किनारपट्टी भागांमध्ये तापमानात वाढ होऊन उष्णतेचा दाह अधिक वाढत असतानाच इथं मराठवाडा आणि विदर्भाला मात्र गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. सध्या मराठवाड्यापासून नजीकच्या भागामध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होत असून, तामिळनाडूच्या दक्षिण भागापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे, ज्यामुळं राज्यात पावसाळी वातावरण तयार झालं आहे. 

मुंबईसह उपनगरांमध्येही सकाळच्या वेळी ढगाळ वातावरण राहणार असून, उन्हाचा लपंडाव सुरुच राहणार आहे. हवामान तज्ज्ञ के.एस.होसाळीकर यांनी X च्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार पुढील 4 ते 5 दिवस विदर्भासह संलग्न मराठवाड्यातील जिल्ह्यांत, काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. याशिवाय इथं गारपिटीचीही शक्यता आहे. शिवाय तापमानात होणारी वाढ मात्र यामुळं प्रभावित होताना दिसणार नसल्यामुळं हवामान अडचणी वाढवणार हेच आता स्पष्ट होत आहे. 

हवामानाचा एकंदर आढावा पाहता राज्याच्या अकोला येथे उष्ण लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, नांदेड, लातूर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली इथं वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

हेसुद्धा वाचा : Osteogenesis Imperfecta Day : कुस बदलताच हाडं फ्रॅक्चर होतात; ठिसूळ हाडांच्या 'या' गंभीर आजाराबद्दल जाणून घ्या

 

पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या बहुतांश भागांमध्ये हवामान कोरडं असेल. विदर्भ आणि मराठवाड्यातील पावसाची हजेरी वगळता रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात हवामान कोरडं असेल. तर, रायगड आणि रत्नागिरीमध्ये मात्र उष्णतेची लाट अधिक तीव्र होताना दिसणार आहे.