गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली : हिंगोली तालुक्यातील सिरसम बुद्रुक ते डिग्रसवाणी रस्त्यावरील वळणावरील एका खड्ड्यात 11 जानेवारी 2024 रोजी दुचाकीसह तिघांचे मृतदेह आढळून आले होते. सुरुवातीला दुचाकीला अपघात (Accident) होऊन तिघांचा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. तिघंही डिग्रसवाणी इथं राहाणारे असून पती पत्नी आणि मुलगा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.. आकाश कुंडलिक जाधव (वय 28) असं मृत मुलाचं नाव तर कलाबाई कुंडलिक जाधव (वय 60) आणि कुंडलिक श्रीपती जाधव (वय 70) अशी मृताची नावे (Triple Murder Case) मिळाली. माहिती मिळताच बासंबा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली, तिघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रूग्णालयात पाठवण्यात आले.
घटनास्थळी जाधव कुटुंबियातील मोठा मुलगा महेंद्र जाधव उदास होऊन बसला होता. लहान भाऊ आई आणि वडिलांना दुचकीवरुन दवाखान्यात घेऊन गेला होता, पण ते परतेलच नाहीत अशी माहिती महेंद्रने पोलिसांना दिली. भाऊ आणि आई-वडील उशीरापर्यंत परतले नसल्याने आपण रात्रीच हिंगोली इतल्या अनेक दवाखाण्यात शोध घेतला. पण ते सापडले नाहीत, त्यामुळे सकाळी घरी येऊन आपण झोपलो. पण सकाळी आपल्याला अपघात झाल्याची माहिती मिळाली आणि आपण तात्काळ घटनास्थळी आलो असं महेंद्राने पोलिसांना सांगितलं.
पोलिसांना खुनाचा संशय
ज्या ठिकाणी अपघात झाला होता त्या ठिकाणी पोलिसांनी तपास सुरु केला. तपासात पोलिसांना हा अपघात नसून खून असल्याचा संशय आला. त्यामुळे पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी घटनेचा सखोल तपास करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील, सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, बांसबा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चवळी, एएस आय नानाराव पोले,पोलिस अंमलदार प्रवीण राठोड,बाबुराव धाबे, नामदेव हाके,शेख उमर यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देत तपासाची चक्रे फिरविली. मृत कुंडलिक जाधव यांचा मोठा मुलगा महेंद्र जाधव याच्याकडे संशयाची सूई फिरत होती. त्यावरून पोलिसांनी महेंद्र यास चौकशीसाठी ताब्यात घेत कसून चौकशी केली. सुरुवातीला महेंद्राने फिरवा-फिरवीची उत्तरं दिली. पण त्याच्या उत्तरात विसंगी आढळल्याने पोलिसांनी कठोर भूमिका घेतली. अखेर महेंद्रने आपणच आई-वडिल आणि भावाचा खून केल्याची कबुली दिली. आरोपी महेंद्र कुंडलिक जाधव याच्या विरोधात खून, बनाव करणे, पुरावा नष्ट करणे यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, आरोपी महेंद्रला पोलिसांनी अटक केली आहे,
असा उघड झाला कट
मृत वडील कुंडलिक जाधव यांची प्रकृती बिघडल्याने भाऊ आकाश जाधव आणि आई कलाबाई जाधव हे वडिलांना हिंगोली इथं दुचाकीवरून दवाखान्यात घेऊन गेले होते. मात्र दवाखान्यात नेत असतांना त्यांचा अपघात होऊन तिघांचाही मृत्यू झाला असे चित्र आरोपी महेंद्रने तयार केलं होतं. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने अस घडलं असावं असे प्रत्यक्षदर्शींना ही वाटत होतं, मात्र पोलिसांनी घटनास्थळ बघताच,अपघातात तिघांचा मृत्यू झाला नसल्याचा संशय आला.
म्हणून केली हत्या
31 वर्षीय महेंद्र कुंडलिक जाधव हा आरोपी वरुड चक्रपाण इथल्या एका वसतिगृहात नोकरीला होता, तो अधून मधून घरी आई वडिलांकडे येत असे, तो खूप शांत आणि संयमी होता, महेंद्रची फारशी लोकांमध्ये उठबस नव्हती. अशी माहिती गावकऱ्यांनी दिली. पण दिवाळीच्या काळात लहान भाऊ आकाश याने त्यांच्या नातेवाईकांना बोलावून घेत महेंद्रची बदनामी केली. शिवाय आई-वडिल त्याला खर्चाला पैसे ही देत नव्हते, नीट बोलत नव्हते, तेव्हा पासून तो झोपेच्या गोळ्या ही खात होता. याचा राग मनात धरून महेंद्रने लहान भाऊ आणि आई वडिलांना संपवण्याचा कट रचला.
10 जानेवारीच्या भल्या पहाटे भाऊ आकाश जाधवला वीजेचा शॉक देण्याचा प्रयत्न महेंद्रने केला. आकाशचे पाय बांधले आणि त्यानंतर त्याच्या डोक्यात वार करून त्याला संपविलं, दुपारी आईला शेतात घेऊन गेला आणि तिकडे आईच्या डोक्यात रॉडचे वार करून तिला संपवलं. शेतातच आईचे गाठोडे बांधून ठेवलं. त्यानंतर 11 जानेवारीच्या रात्री दीड वाजता वडिलांना घरातच रॉड डोक्यात टाकून मारलं, त्यानंतर त्याने एका एकाला दुचाकीवर बसवून नेत अपघास्थळी नेऊन टाकलं.