Maharashtra Rain : पावसाचा मुक्काम वाढला; राज्यात पुढील काही दिवस संततधार

Maharashtra Rain : गणेशोत्सवाच्या निमित्तानं सध्या अनेकजण विविध बाप्पांच्या भेटीसाठी बाहेरस पडण्याचे बेत आखत आहेत. अशा सर्वच मंडळींनी पावसाचा अंदाजही लक्षात घ्यावा.   

सायली पाटील | Updated: Sep 20, 2023, 08:38 AM IST
Maharashtra Rain : पावसाचा मुक्काम वाढला; राज्यात पुढील काही दिवस संततधार  title=
Maharashtra Rain predictions for next three days latest weather updates

Maharashtra Rain : जुन महिन्यात दडी मारून बसलेल्या पावसानं थेट ऑगस्टपर्यंत सुट्टी घेतली आणि अखेर सप्टेंबर महिन्यात तो असा काही परतला की हवामान विभागानं थेट या पावसाचा मुक्काम आता वाढल्याचीच माहिती दिली. सोमवारपासून पावसानं राज्यात पुन्हा जोर धरला आणि कोकणापासून विदर्भापर्यंत तो अधूनमधून बरसत राहिला. मंगळवारी गणेश चतुर्थीच्या दिवशीही असंच चित्र पाहायला मिळालं. ज्यानंतर आता पुढचे काही दिवसही राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची संतताधर सुरुच राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

मुंबई, ठाणे, पालघरमध्येही ढगाळ वातावरण असेल. तर, काही ठिकाणी पाऊस उघडीप देणार आहे. त्यामुळं घराबाहेर पडण्याआधी पावसाचीही सोय करूनच निघणं उत्तम असेल. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या काळात परतीच्या पावसाचा प्रवास ऑक्टोबरच्या मध्यापासून सुरु होईल. तोपर्यंत राज्यात कमी दास्त प्रमाणत विविध जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावताना दिसणार आहे. मराठवाड्यावर मात्र सध्या पावसाची वक्रदृष्टी झाल्याची चिन्हं आहेत. कारण, इथं नांदेड, लातूर आणि हिंगोली वगळता उर्वरित भागामध्ये खरिपाच्या पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 

दरम्यान, बंगालच्या उपसागरामध्ये चक्रिय वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्यामुळं त्याचा परिणाम कमी दाबाच्या पट्ट्याच्या निर्मितीमध्ये होत आहे. ज्यामुळं 22 ते 24 सप्टेंबर या दिवसांत राज्यात विदर्भ आणि कोकणावर पावसाची कृपा होऊ शकते. 22- 23 सप्टेंबरला जालन्यापासून बीडपर्यंत वादळी वाऱ्यांसह पावसाची हजेरी असेल. 

हेसुद्धा वाचा : 40 हजार 446 कोटींचा फटका! भारताशी पंगा घेणं कॅनडला खरंच पडणार 'महागात'

 

देश पातळीवर कसं असेल पुढील 24 तासांतील हवामान? 

Skymet च्या अंदाजानुसार पुढील 24 तासांमध्ये सौराष्ट्र, कच्छ, पश्चिम बंगाल, ओडिशाच्या काही भागांमध्ये हलक्या स्वरुपातील पावसाची हजेरी असेल. तर, तामिळनाडू, केरळ आणि राजस्थानच्या दक्षिण भागामध्ये ही पावसाच्या तुरळक सरींची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. 

हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, कोकण, गोवा, अंदमान, लक्षद्वीप, तेलंगणाच्या काही भागांसह कर्नाटकच्या अंतर्गत भागांमध्येही पावसाच्या मध्यमत ते हलक्या सरींची शक्यता आहे. देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशचा पश्चिम भाग इथंही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. देशाच्या काही पर्वतीय भागांमध्ये बर्फवृष्टीचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.