पवारांच्या कार्यक्रमाला अजितदादा नाहीच, काटेवाडीत भेटीगाठी, बारामतीत दांडी

Pawar vs Pawar : बारामतीतल्या गोंविदबागेत यंदाही दिवाळी पाडवा साजरा झाला. मात्र या सोहळ्याला अजित पवारांनी दांडी मारली. यावर आजारपणामुळे कोणी आलं नाही तर गैरसमजाचं कारण नाही असं विधान शरद पवार यांनी केलं आहे.

Updated: Nov 14, 2023, 06:35 PM IST
पवारांच्या कार्यक्रमाला अजितदादा नाहीच, काटेवाडीत भेटीगाठी, बारामतीत दांडी title=

Pawar vs Pawar :  दरवर्षी दिवाळी पाडव्याला गोविंदबागेत पवार कुटुंब बारामतीकरांची (Baramati) भेट घेतं.. सकाळी लवकर शरद पवारांसह (Sharad Pawar) अवघं पवार कुटुंब बारामतीकरांशी संवाद साधतं. याही वर्षी शरद पवार, सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा स्वीकारल्या. मात्र गोविंदबागेतला यंदाचा दिवाळी पाडवा चर्चेत आहे तो अजित पवारांच्या (Ajit Pawar) दांडीमुळे. पवार कुटुंबाच्या दिवाळी पाडवा सेलिब्रेशनमध्ये अजितदादांनी येणं टाळलं. दादांनी येणं टाळलं असंच म्हणावं लागेल कारण अजित पवार काटेवाडीत मुक्कामी आहेत. काटेवाडीत लोकांच्या भेटीगाठी ते घेतायत. अगदी किल्ले स्पर्धेलाही त्यांनी भेट दिली. इतकंच काय तर बारामतीतल्या शारदोत्सव कार्यक्रमालाही मास्क घालून दादा आले होते. इतकं असूनही पवार कुटुंबाच्या गोविंदबागेतल्या कार्यक्रमाला येणं मात्र दादांना जमलं नाही! त्यामुळे अजितदादांच्या अनुपस्थितीची चर्चा सुरु आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर पवार कुटुंबाची पहिलीच दिवाळी आहे. आणि या दिवाळीत पवार कुटुंबिय एकत्र आल्याचं दिसून येतंय. एकीकडे दादांच्या अनुपस्थितीची चर्चा असताना दादांच्या पत्नी सुनेत्रा पवार मात्र गोविंदबागेतल्या कार्यक्रमात उपस्थित होत्या तर दादांचे पुत्र पार्थ पवार यांनीही शरद पवारांची भेट घेत आशीर्वाद घेतले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी दिवाळीनिमित पवार कुटुंबाचे फोटो शेअर केले आहेत. यात खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार कुटुंबियांसोबत एकत्र दिसत आहेत.

दरम्यान आजारपणामुळे कोणी आलं नाही तर गैरसमजाचं कारण नाही अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी अजित पवारांवर दिलीय. आजारपणामुळे कोणी आलं नाही तर गैरसमजाचं कारण नाही असं शरद पवार म्हणालेत.दरम्यान दादांनी गोविंदबागेत येणं टाळलं असलं तरी सुप्रिया सुळे भाऊबीजेनिमित्त काटेवाडीला जाणार आहेत. गोविंद बागेतील पाडवा कार्यक्रमाला अजित पवार उपस्थित नव्हते. मात्र सुप्रिया सुळे उद्या भाऊबीज साजरी करण्यासाठी काटेवाडीला जाणार आहेत. राजकीय मतभेद एका बाजुला आणि कौटुंबिक सलोखा आणि नाती एका बाजुला असं यापूर्वीही सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलंय. 

अजित पवार काटेवाडीत
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काल बारामतीच्या काटेवाडीत भेट दिली.. काटेवाडी येथील देविदास काटे यांचे काही दिवसांपूर्वी निधन झालं. त्यांच्या घरी जाऊन अजित पवारांनी  कुटुंबियांची भेट घेतली. अजित पवार परवा बारामतीतील शारदोत्सवाला मास्क घालून हजेरी लावली होती. परंतु अजित पवार काटेवाडीतील धनी वस्तीवर विनामास्क किल्ला पाहायला गेले होते.. मात्र काटेवाडीत गेलेले अजित पवार आजच्या गोविंदबागमधल्या दिवाळी पाडव्यात मात्र गैरहजर होते. त्यामुळे अजित पवार पाडव्याला शरद पवारांसोबत का आले नाहीत याचीच सध्या चर्चा आहे..

वासूदेवाची विनंती
शरद पवारांना सोडून गेलेल्यांनी परत यावं अशी विनंती वासुदेवाने केलीये. दिवाळी निमित्त वासुदेव शरद पवारांना भेटण्यासाठी गोविंद बागेत आले होते. लोकगीतातून हरिनामाचा गजर करीत पारंपरिक लोकगीते गाणाऱ्या या वासुदेवांनी अजित पवारांनाही गाण्यातूनच साद घातलीय..