Maharashtra Politics : गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्राचं राजकारण मोठ्या घडामोडींनी ढवळून निघालं आहे. महाविकास आघाडीच्या निर्मितीपासून ते शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीपर्यंत राज्याच्या राजकारणात मोठे भूकंप झाले. या सगळ्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांकडे बोट दाखवलं. दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा अडीच वर्षांनी आलो, पण दोन पक्ष फोडून आलो असं विधान केलं होतं. विरोधकांनी यावरुन सत्ताधाऱ्यांना घेरलं होतं. यावर आता शरद पवारच पक्ष फोडण्यात मास्टर असल्याचं विधान भाजप नेत्याने केलं आहे.
भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेना ठाकरे गटाला लक्ष्य केलंय. राज्यात ज्या शरद पवारांनी पक्ष फोडण्याचा इतिहास रचला त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायचं आणि पक्ष फोडणाऱ्यांविषयी जनतेच्या मनात चीड आहे असं म्हणायचं. हा विरोधाभास असल्याचा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला. शरद पवार हे पक्ष फोडण्यामध्ये मास्टर आहेत. त्यांचं राजकारण पक्ष फोडण्यापासून सुरू झालंय आणि आजही सुरू असल्याचे प्रवीण दरेकर म्हणाले. दरेकर हे महाड इथं भाजप कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
दोन पक्ष फोडून आलो - देवेंद्र फडणवीस
एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक विधान केलं होतं. "मी पुन्हा येईल ही सिंगल लाईन कधीच नव्हती. मी पुन्हा येईल याबद्दल बऱ्याच गोष्टी होत्या. मी काय करेल हे सगळ सविस्तर सांगितल होतं. मी पुन्हा येईल, तर मी आलोच. जरासा वेळ लागला पण मी आलो तर दोन्ही पक्ष फोडूनच आलो. माझा मूळ स्वभाव हा संयमी आहे. उत्तर द्यावं लागतच पण, वेळ पाहावी लागते. योग्य वेळी उत्तर दिलं तर जग तुमचं उत्तर ऐकतं," असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं.
उद्धव ठाकरेंची टीका
काही दिवसांपूर्वी सांगलीतल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली होती. "उद्धव ठाकरे जर फालतू माणूस असेल तर तुम्ही माझा पक्ष का फोडला याचं पहिलं मला उत्तर द्या. मी मन की बात करत नाही मी जन की बात करतो. देवेंद्र फडणवीस म्हणाले मी पुन्हा आलो पण दोन पक्ष फोडून आलो, खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस हे घरफोड्या आहेत. दुसऱ्याच्या घरावरती दरोडा टाकायचा, दुसऱ्याच्या घरातले पैसे चोरायचे आणि सांगायचं बघा मी दोन घरं फोडून श्रीमंत झालो. अरे दुसऱ्याचे पैसे चोरतोस, दुसऱ्याची संपत्ती चोरतोस आणि त्या संपत्तीवरती तू नागोबासारखा बसतोस, तू कसला रे मर्द? तू कसला राजकारणी?" अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती.