'30 पैकी 15 हजार ट्रेनी नोकऱ्या'; नमो रोजगार मेळाव्यावरुन सुप्रिया सुळेंची टीका

Baramati Namo Rojgar Melava : बारामतीमध्ये झालेल्या रोजगार मेळाव्यावरुन खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली आहे. सरकारने अशा मेळाव्यावर खर्च करण्यापेक्षा शेतकऱ्यांची मदत करावी असे सुप्रिया सुळेंनी म्हटलं.

आकाश नेटके | Updated: Mar 3, 2024, 12:57 PM IST
'30 पैकी 15 हजार ट्रेनी नोकऱ्या'; नमो रोजगार मेळाव्यावरुन सुप्रिया सुळेंची टीका title=

निलेश खरमारे, झी मीडिया, पुणे : बारामती येथे झालेल्या नमो महारोजगार मेळाव्यावरुन आता राजकारण सुरु झालं आहे. या मेळाव्याची मोठ्या प्रमाणात जाहीरातबाजी करण्यात आली होती. या मेळाव्यातून 43 हजार तरुणांना रोजगार मिळेल, असे सरकारकडून सांगण्यात आलं होतं. मात्र सांगितलेल्या पदांपेक्षा कमी पदे भरली जाणार असल्याने आता विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांची बारामतीमध्ये झालेल्या नमो महारोजगार मेळाव्यावर सडकून टीका केली आहे.

पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील  युवकांसाठी बारामतीमध्ये नमो महारोजगार मेळावा भरवण्यात आला होता. या रोजगार मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आणि शरद पवार उपस्थित होते. या महारोजगार मेळाव्यात 43 हजार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार असून यामध्ये साडेतीनशेहून अधिक कंपन्यांनी सहभाग घेतल्याचे सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात सरकारकडून 30 हजार पदांचीच घोषणा करण्यात आल्याचा दावा सुप्रिया सुळे यांनी केला. भोर तालुक्यात झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीवेळी सुप्रिया सुळे यांची नमो महारोजगार मेळाव्यावर जोरदार टीका केली.

"नोकरी म्हणलं की आपल्यात अप्रँटशिप किंवा ट्रेनी म्हणतं नाहीत. त्यांनी आधी सांगितल 43 हजार नोकऱ्या, मग म्हटंले की 30 हजार नोकऱ्या, मग नंतर म्हणाले त्या 30 हजार पैकी 15 हजार या ट्रेनी नोकऱ्या आहेत आणि आता उर्वरित कायं आहेत हे नक्की माहिती नाहीत," असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

"लोकसभा निवडणूक आली की हे मोठे मोठे मेळावे घेतात आणि याला खर्च केंद्र सरकार करतं. या सगळ्या मधून जाहिरात कुणाची होतीय? तर यांच्या महायुतीची. यामध्ये सरकारी यंत्रणेचा गैरवापर हा सातत्याने यांची जाहिरात करण्यासाठी होत आहे. हे मोठं दुर्दैव आहे. मेळाव्यासाठीच्या पेंडॉलचा एक दिवसाचा खर्च हा 1 कोटी आहे. सरकारने शासन आपल्या दारी किंवा अशा प्रकारच्या मेळाव्यावर खर्च करण्यापेक्षा या खर्चातून शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली असती तर त्यांचे आशीर्वाद मिळाले असते," असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

आम आदमी पक्षाचे गंभीर आरोप

बारामतीतल्या नमो महारोजगार मेळाव्यावरुन माहिती अधिकार कार्यकर्ते आणि आम आदमी पक्ष महाराष्ट्राचे उपाध्यक्ष विजय कुंभार यांनी गंभीर आरोप केले. या मेळाव्यात रोजगार देण्यासाठी सहभागी झालेल्या काही कंपन्यांची माहिती  सापडत नाही. तसेच काही कंपन्यांच्या नावाशी साधर्म्य असलेली वेगळीच कंपनी दिसून येत आहे, असे धक्कादायक दावा आपने केला होता.