सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) गेल्या काही दिवसांपासून अनेक कार्यक्रमात दिसत आहेत. यातून राजकीय भाष्य करत सातत्याने सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधत आहेत. काल पुणे इथल्या कोंढव्यात झालेल्या कार्यक्रमात साईनाथ बाबर (Sainath Babar) दिल्लीत गेला तर दुधात साखर पडेल असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे वसंत मोरे (Vasant More) यांचा पत्ता कट झाला का अशा शक्यता वर्तवली जात असतानाच मनसे नेते वसंत मोरे यांनी ठेवलेलं स्टेटस चर्चेचा विषय बनलं आहे.
वसंत मोरेंचा रोख कोणाकडे?
वसंत मोरे यांनी स्टेट्समध्ये आपला फोटो ठेवला असून त्याखाली एक वाक्य लिहिलंय. यात त्यांनी म्हटंलय "कुणासाठी किती बी करा राव, वेळ आली की फणा काढतातच, पण एक लक्षात ठेवा मी बी पट्टीचा गारुडी आहे योग्य वेळी सगळी गाणी वाजवणार' असं म्हंटल आहे. काल झालेल्या साईनाथ बाबर यांच्या कार्यक्रमानंतर दुसऱ्या दिवशी हे स्टेटस ठेवण्यात आल्यामुळे याचा रोख नेमका कोणाकडे आहे याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालीय.
गेल्या निवडणुकीमध्ये पुण्यातून मनसेचे दोन नगरसेवक निवडणूक जिंकले होते. त्यामध्ये एक वसंत मोरे आणि दुसरे साईनाथ बाबर त्यामुळे हे नेते वारंवार एकत्र दिसत असत. त्यामुळे त्यांच्या मैत्रीच्या चर्चा पालिका वर्तुळात नेहमी चर्चिला जात होत्या. मात्र दरम्यानच्या काळात राजकीय घडामोडीमुळे वसंत मोरे यांना शहराध्यक्ष पदावरून पायउतार व्हावं लागलं आणि शहराध्यक्षाची पदाची माळ साईनाथ बाबर यांच्या गळ्यात पडली. त्यानंतर या नेत्यांमध्ये कुरभुर सुरू झाल्याचा बोललं जात आहे. पहिल्या सारखे वसंत मोरे आणि साईनाथ बाबर एकत्र दिसत नाहीत.
वसंत मोरेंची बॅनरबाजी
वसंत मोरे यांनी पुण्यात बॅनरबाजी करून आपण लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं यापूर्वीच दाखवून दिला आहे. अशातच शर्मिला ठाकरे यांनी साईनाथ बाबर यांना मला वरच्या पदावर पहायचं आहे. त्यांना आता महापालिकेत पाठवायचे नाही. त्यांना दिल्लीत पाठवले तर दुधात साखर पडेल. असं वक्तव्य केल्याने साईनाथ बाबर यांचा लोकसभेचा मार्ग मोकळा झाल्याचा बोललं जात आहे.
एकीकडे वसंत मोरे यांनी लोकसभा मैदानात उतरण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यानिमित्ताने जनता दरबार असो की शहरभर 'पुण्याची पसंत मोरे वसंत' अशी केलेली बॅनरबाजी असो. एकीकडे वसंत मोरेंची तयारी तर दुसरीकडे शर्मिला ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे मोरेंचा पत्ता कट झाला का असा चर्चा सुरू आहेत. आता वसंत मोरे यांच्या स्टेटस मुळे मनसेमध्ये कॉल्ड वॉर रंगणार असल्याचं स्पष्ट झाला आहे.
दरम्यान राज ठाकरे यांनी पुणे लोकसभेचे प्रभारी म्हणून अमित ठाकरे यांच्यावर जबाबदारी दिली आहे. त्या अनुषंगाने अमित ठाकरे यांनी नुकत्याच पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या होत्या. त्याचा अहवाल राज ठाकरे यांच्यासमोर ठेवण्यात आला आहे.