लोकसभेचा चौथा टप्पा संपताच महायुतीतला वाद चव्हाट्यावर? अजित पवार यांना मोठा धक्का बसणार

Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या जरंडेश्वर साखर कारखान्याची चौकशी सुरु करण्यात येणार आहे. 

राजीव कासले | Updated: May 28, 2024, 06:05 PM IST
लोकसभेचा चौथा टप्पा संपताच महायुतीतला वाद चव्हाट्यावर? अजित पवार यांना मोठा धक्का बसणार title=

Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा संपताच महायुतीतला (Mahayuti) वाद चव्हाट्यावर आला आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या जरंडेश्वर कारखान्याच्या (Jarendeshwar) चौकशीचे आदेश देण्यात आले असून अजित पवार यांना हा मोठा धक्का असल्याचं बोललं जातंय. जरंडेश्वर कारखान्यातील गैरव्यावहार, कोरेगाव इथल्या एका भुखंड आणि डीस्टलरी प्रकल्पासंर्दभात चौकशी सुरु करण्यात येत आहे. जरंडेश्वर साखर कारखान्याची पुन्हा चौकशी सुरु झाल्याने महायुतीत सर्व आलबेल नसल्याची चर्चा सुरु झालीय. 

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्यानंतर अजित पवार यांनी महायुतीच्या प्रचाराकडे पाठ फिरवली होता.  ईडीने जरंडेश्वर कारखान्याची चौकशी करुन चार्जशीट दाखल करताना त्यातुन अजित पवार यांचे नाव वगळले होते. मात्र आता पुन्हा एसीबीने चौकशी सुरु केल्याने खळबळ उडाली आहे.

काय आहे जरंडेश्वर कारखान्याचा वाद
सातऱ्यातील जरंडेश्वर कारखाना हा तत्कालीन आमदार शालिनीताई पाटील यांच्या ताब्यात होता, पण हा कारखाना कर्जात बुडाला आणि अखेरीस या कारखान्याचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुणे जिल्हा बँकेने जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याला 826 कोटी रुपायांच कर्ज दिलं होतं. पण लिलावात अजित पवार यांच्याशी संबंधित व्यक्तीने हा कारखाना कवडीमोल दराने विकत घेतल्याचा आरोप होता. 2010 मध्ये जरंडेश्वर कारखाना गुरु कमोडिटी प्रा. लिने अवघ्या 65 कोटी 74 लाख रुपयात हा कारखाना खरेदी केला. 

जरंडेश्वर लिलाव प्रक्रिया बोगस असल्याचा आरोप करत शालिनीताई पाटील यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. हायकोर्टाने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर ईडीकडून या सर्व प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली. यादरम्यान सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने जरंडेश्वर बँकेला 96 कोटी रुपयांचं कर्ज दिलं. पण कारखान्याीच मूळ किंमत कमी असातना इतक्या मोठ्या प्रमाणात कर्ज का देण्यात आलं असा सवाल उपस्थित करण्यात आला. याप्रकरणी ईडीने कारखानाच्या सर्व संचालकांवर गुन्हा दाखल केला.