'ही वस्तुस्थिती आहे की...'; छगन भुजबळांच्या राजीनाम्यावर देवेंद्र फडणवीसांची स्पष्ट भूमिका

Chhagan Bhujbal : अहमदनगर येथे ओबीसी मेळाव्यात बोलत असताना छगन भुजबळ यांनी आपण अडीच महिन्यांपूर्वीच मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचा गौप्यस्फोट केला. या गौप्यस्फोटामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

आकाश नेटके | Updated: Feb 4, 2024, 07:55 AM IST
'ही वस्तुस्थिती आहे की...'; छगन भुजबळांच्या राजीनाम्यावर देवेंद्र फडणवीसांची स्पष्ट भूमिका title=

Chhagan Bhujbal Resignation : ओबीसी मेळाव्याआधीच 16 नोव्हेंबर रोजीच मंत्रिपदाचा राजीनामा दिला असा गौप्यस्फोट राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी केलाय. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलत असताना भुजबळांनी नगर येथील ओबीसी एल्गार परिषदेत हा गौप्यस्फोट केला. भुजबळ यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता छगन भुजबळांच्या दाव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले छगन भुजबळ?

"मी अशी भाषणे करतो, सरकारमधले, विरोधी पक्षातील सगळे बोलतात, तुम्ही राजीनामा द्या, हिंमत असेल तर राजीनामा द्या. माझ्या सरकारमधीलही नेते बोलतात. काल-परवा एकजण बडबडला. या भुजबळाला कमरेत लाथ घालून मंत्रिमंडळाला बाहेर हाकला असं म्हणाला. मला त्या सर्वांना विरोधी पक्ष, स्वपक्षातील, सरकारला सांगायचे आहे. १७ नोव्हेंबरला जालनातील अंबडला रॅली झाली. १६ नोव्हेंबरला मी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. त्यानंतर अंबडच्या सभेला रवाना झालो. लाथ मारण्याची मला गरज नाही. अडीच महिने मी शांत राहिलो, याची वाच्यता नको असं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. लाथ मारायची गरज नाही. मी शेवटपर्यंत ओबीसीसाठी लढणार आहे," असा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी केला.

देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

गडचिरोलीत बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळ यांच्या राजीनामा विषयावर प्रतिक्रिया दिली. हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. मात्र मुख्यमंत्री व आम्ही कोणीही छगन भुजबळ यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही ही वस्तुस्थिती आहे, असे देवेंद्र फडणवीस यांन म्हटलं.

मुख्यमंत्र्यांनाही केलं लक्ष्य

"मराठा समाजाला आरक्षण देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांची घेतलेली शपथ पूर्ण केल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. त्यांनी शिवरायांची शपथ पूर्ण झाली असेल तर पुन्हा राज्य मागासवर्गीय आयोगाकडून सर्वेक्षण कशासाठी केले जात आहे?," असा सवाल छगन भुजबळ यांनी केला.

देवेंद्र फडणवीसांवर व्यक्त केली नाराजी

"श्रीगोंद्यात ओबीसी एल्गार सभेची पूर्वतयारी सुरू असताना तिथे पोलीस पाठवण्यात आले आणि काम थांबवण्यात आलं. पोलिसांकरवी ओबीसी समाजात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यांना नोटीसा पाठवल्या जात आहेत. हे सगळं नेमकं काय चाललंय? देवेंद्र फडणवीस साहेब, हे सगळं काय चाललंय. तुमच्या गृह विभागाला सांगा की तुमच्याकडून असा भेदभाव होता कामा नये. जे काही नियमाने असेल ते सगळ्यांनी करावं. आम्हाला एक न्याय आणि त्यांना रात्री ३ वाजता सभेची परवानगी कशी मिळते? मराठा समाजातील लोकांची सभा रात्री दोन वाजता होते, त्यांना परवानगी कशी काय दिली जाते. त्यांच्यावर कारवाई का होत नाही. कुठलेही पोलीस त्यांच्यावर कारवाई का करत नाहीत?," असा सवालही छगन भुजबळांनी केला.