उद्धव ठाकरे यांच्या भोळ्या चेहऱ्यामागे अनेक लपलेले चेहरे... रामदास कदम यांचा घणाघात

Uddhav Thackeray : केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला बहाल केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच खेड येथील जाहीर सभेत शिंदे गटावर जोरदार टीका केलीय. मात्र आता रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत याला प्रत्युत्तर दिलं आहे

Updated: Mar 6, 2023, 11:38 AM IST
उद्धव ठाकरे यांच्या भोळ्या चेहऱ्यामागे अनेक लपलेले चेहरे... रामदास कदम यांचा घणाघात title=

Maharashtra Politics : रविवारी खेड (Khed) येथील गोळीबार मैदानावर झालेल्या जाहीर सभेत शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी आमदार संजय कदम (Sanjay Kadam) यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. यावेळी निवडणूक आयोगास, शिंदे गटावर (Shinde Group) उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले. निवडणूक आयोगाने शिवसेना (Shiv Sena) हे पक्ष नाव मिंधे गटाला दिले असले तरी मी आमच्या संघटनेला शिवसेनाच म्हणणार. कारण निवडणूक आयोगाचा फैसला मला मान्य नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. यासोबतच शिंदे गटाचे स्थानिक नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्यावरही उद्धव ठाकरे यांनी तोफ डागली.

मात्र सोमवारी पत्रकार परिषद घेत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेआधीच खेडमधील वातावरण तापलं होतं. त्यानंतर सभेत यांनी उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली होती. यावर प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे यांच्या भोळ्या चेहऱ्यामागे अनेक चेहरे आहेत असे म्हटले आहे. 

"माध्यमांसमोर जाण्यास मला बंदी घालण्यात आली होती. अयोध्येमध्ये जाण्यासाठी उद्धव ठाकरे निघाले होते तेव्हा सगळी व्यवस्था रामदास कदम यांनी केली होती. संजय राऊत यासाठी साक्षीदार आहेत. पण आदल्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी मला बोलवून घेतले आणि माझ्यासोबत अयोध्येला यायचं नाही असं सांगितले. मला काही कळले नाही. बाळासाहेब गेल्यानंतर माझ्या सभा बंद करुन टाकल्या. उद्धवजी तुमचा चेहरा भोळा दिसतो. पण त्या भोळ्या चेहऱ्यामागे अनेक चेहरे लपलेले आहेत याचा मी साक्षीदार आहे. तुमची नस मी ओळखतो," असे रामदास कदम म्हणाले.

ज्यांनी बाळासाहेबांना बघितलेलेसुद्धा नाही ते आज...

"निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव मिंधे गटाला दिले असले तरी मी आमच्याच संघटनेला शिवसेनाच म्हणणार. निवडणूक आयोगाचा निर्णय मला मान्य नाही. भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारी संघटना म्हणून शिवसेनेचा जन्म झाला. पण ज्यांनी बाळासाहेबांना बघितलेलेसुद्धा नाही, ते आज आम्हाला त्यांचे विचार शिकवत आहेत. ज्यांना या संघटनेने बळ दिले, मोठे केले तेच निर्दयीपणे, निर्घृणपणे वागत आहेत," असे उद्धव ठाकरे म्हणाले.