'मी सदानंद सुळेंना मतं मागायला फिरवत नाही'; सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला

Supriya Sule : बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद आणि भावजय यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार उभ्या राहणार असल्याचे म्हटलं जात आहे.

आकाश नेटके | Updated: Feb 26, 2024, 01:15 PM IST
'मी सदानंद सुळेंना मतं मागायला फिरवत नाही'; सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला title=

Baramati Lok Sabha : बारामती लोकसभा मतदारसंघावरुन सध्या शरद पवार गट आणि अजित पवार गटात जोरदार वाद सुरु आहे. त्यामुळे बारातमी लोकसभा मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. या मतदारसंघातून आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा नणंद-भावजयचा लढत पाहायला मिळणार असल्याचे म्हटलं जातंय. अशातच अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना टोला लगावला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या विषयीची माहिती देणारा आणि त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा विकास रथ शहरात फिरत आहे. त्यामुळे बारामतीत आता नणंद-भाजवयांची लढत होणार असल्याचे म्हटलं जात आहे. अजित पवार यांनीही बारामतीवर लक्ष्य  केंद्रीत केले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात बारामती लोकसभा मतदारसंघात पवार घराण्यातील संघर्ष अटळ आहे. अशातच पुण्यात बोलताना सुप्रिया सुळे यांनी मी मतं मागते, सदानंद सुळेंना मतं मागायला फिरवत नाही, अशा शब्दांत सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांच्यावर बोचरी टीका केली.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

"मी आता जी मतं मागते ती मेरिटवर मागते. मतं मागायला मी जाते, सदानंद सुळेंना मतं मागायला फिरवत नाही. लोकसभा निवडणूक लढायच्या दोन वर्ष आधीपासून मी मतदार संघांचे दौरे करत होते. दोन वर्षात मी संपूर्ण मतदार संघ पिंजून काढलाय. मी लोकप्रतिनिधी आहे, नवऱ्याने पेपर भरायचा आणि मी पास व्हायचं..असं कॉपी करून पास नाही होणार, मैं सुप्रिया सुळे हू..खुद करुंगी और खुद पास हुंगी," असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला.

हा काही भातुकलीचा खेळ नाही - सुप्रिया सुळे

याआधी सुनेत्रा पवारांच्या निवडणुकीवरुन सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली होती. "हा काही भातुकलीचा खेळ नाही. राजकारण भातुकलीचा खेळ नसतो. त्यात नाती नसतात पण जबाबदारी असते. नाती प्रेमाची असतात. मी नात्यांमध्ये आणि कामात गल्लत करत नाही. माझं काम एका जागेवर आहे. माजी नाती काही आडनावांपुरती मर्यादित नाही. मी सदानंद सुळेंसोबत जेवढा वेळ घालवते त्यापेक्षा जास्त कार्यकर्त्यांसोबत असते. नाती माझ्यासाठी कायमच राहतील. पण माझं एक प्रोफेशनल आयुष्य आहे, माझी एक वैचारिक बैठक आहे. ज्याच्यामध्ये मी लहानाची मोठी झाले. माझ्यासाठी ही लढाई वैयक्तिक नाही. माझी वैचारिक लढाई आहे. माझी लढाई भाजप आणि त्यांच्या चुकीच्या निर्णयांच्या विरोधात आहे. त्यांच्या चुकीच्या विचारात जे काम करत असतील त्या विचाराशी माझी लढाई आहे," असे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.