उगाच पलटण चालूय, देव वरुन देतोय का?... शरद पवार यांचा उल्लेख करत कुटुंब नियोजनावर अजित दादांचा सल्ला

Ajit Pawar : पोरगंच पाहीजे, कशाचा वंशाचा दिवा. मुलगीदेखील कर्तबगार असते हे अनुभवतोय. त्यामुळे मर्यादित कुटुंब ठेवा, असेही अजित पवार म्हणाले

Updated: Jan 15, 2023, 04:49 PM IST
उगाच पलटण चालूय, देव वरुन देतोय का?... शरद पवार यांचा उल्लेख करत कुटुंब नियोजनावर अजित दादांचा सल्ला  title=
(फोटो सौजन्य - PTI)

Maharashtra Politics : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे नेहमीच आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओखळले जातात. आपल्या बेधकड वक्तव्यांनी कधी काळी अडचणीत आलेले अजित पवार बोलताना आता सावधगिरी बाळगताना दिसतात. खुद्द अजित पवार यांनीही अनेकदा याबाबत उल्लेख केला आहे. अशातच रविवारी एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी मिश्किल टिप्पणी केली आहे. या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी दिलेला कुटुंब नियोजनाचा (family planning) सल्ला ऐकून सर्वांनाच हसू अनावर झालं. 

"महिलांना जाता जाता एकच सांगतो आवडो किंवा न आवडो. आपली सूनबाई किंवा मुलीला दोन अपत्यांवरच थांबायला सांगा. आणखी अजिबात काही वाढवा वाढवी नको. दोन्ही मुली झाल्या तरी त्या सोन्यासारख्या आहेत. शरद पवार एका अपत्यावर थांबले की नाहीत. सुप्रिया शरद पवार यांचे नाव काढत आहे की नाही. पोरगंच पाहीजे, वंशाचा दिवाचा पाहिजे. कशाचा वंशाचा दिवा. मुलगीदेखील कर्तबगार असते हे अनुभवतोय. त्यामुळे मर्यादित कुटुंब ठेवा," असा सल्ला अजित पवार यांनी दिला.

 
"छोट्या कुटुंबामुळे सगळ्या सुविधा तुम्हाला मिळतील. नाहीतर उगाच पलटण चालू आहे. देवाची कृपा म्हणून. देव वरुन देतोय का? आम्हाला कळत नाहीये का कोणाची कृपा आहे," असा टोला अजित पवार यांनी लगावला.

या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी बारातमतीकरांसाठी केलेल्या उपाय योजांबाबतही माहिती दिली. "दुष्काळ पडला तरी बारामतीकरांना पाणी मिळालं पाहिजे आमचा प्रयत्न आहे. मोठे पाणीसाठे तुमच्यासाठी करतोय. तुम्ही आमच्यावर विश्वास टाकलाय. त्यामुळे तुम्ही टाकलेल्या विश्वासाला मी किंवा माझे सहकारी तडा जाऊ देणार नाही," असेही अजित पवार म्हणाले.