जीवघेणा ठरला नायलॉन मांजा... 11 वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू

Crime News : बंदी असतानाही नायलॉन मांजाची सर्रास विक्री केली जात आहे. काही जणांसाठी क्षणिक आनंद देणारा पतंग उडवण्याचा खेळ एका मुलाच्या जीवावर बेतला आहे

Updated: Jan 15, 2023, 04:02 PM IST
जीवघेणा ठरला नायलॉन मांजा... 11 वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू  title=

पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर : राज्यात बंदी असतानाही मकरसंक्रात (makar sankranti) सणानिमित्ताने पंतग उडविण्यासाठी नायलॉन मांजाची (nylon manja) विक्री मोठ्या प्रमाणात होताना दिसतेय. सुरुवातीला पक्ष्यांसाठी धोकादायक ठरत असलेला आता माणसांच्याही जीवावर उठला आहे. नायलॉन मांजामुळे पक्ष्यांना व नागरिकांना गंभीर इजा झाल्याची अनेक प्रकरणे गेल्या काही दिवसांत समोर आली आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी नायलॉनच्या मांज्यावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरीही अशा मांजाची सर्रासपणे विक्री केली जात आहे. अशातच या मांजामुळे एका 11 वर्षीय मुलाला प्राण गमवावे लागले आहेत.

नागपुरात नायलॉन मांजाने गळा कापल्याने 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. नागपुरच्या जरीपटका परिसरात महात्मा गांधी शाळेतून शनिवारी संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर 11 वर्षीय मुलगा वडिलांसोबत दुचाकीवरुन घरी  परतत होता. त्यावेळी मांज्यामुळे त्याचा गळा चिरला गेला. यानंतर उपचारासाठी मुलाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गळ्याला गंभीर दुखापत झाल्याने प्रचंड रक्तस्राव झाला होता. दरम्यान, रविवारी उपचारादरम्यान मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

दुसरीकडे दोन दिवसांपूर्वी पतंग पकडण्याच्या नादात रेल्वेच्या धडकेत 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यानंतरही नायलॉन मांजामुळे गंभीर अपघाताच्या घटना सातत्याने घडताना दिसत आहेत.

दरम्यान, राज्यात नायलॉनच्या मांजामुळे अनेक अपघातांच्या घटना समोर आल्या आहेत. येवल्यातील बाभूळगाव रस्त्यावर नायलॉन मांजात अडकून एका व्यक्तीचा गळा चिरला गेला. त्या व्यक्तीला गळ्याला 25 टाके पडले असून त्याच्या हातालाही गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुसरीकडे गेल्या आठवड्यात दोन मुली नायलॉनच्या जाळ्यात अडकून जखमी झाल्या. नागपूरमध्येही 17 वर्षीय मुलाच्या गळ्यात मांजा अडकला. त्यामुळे त्याचा गळा कापला गेला.