'अजिबात खपवून घेणार नाही'; संघर्ष केला नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना रोहित पवारांचे प्रत्युत्तर

Maharashtra Politics : आमदार रोहित पवार यांनी दसऱ्याच्या दिवशी सुरू केलेल्या युवा संघर्ष यात्रेवर उपमुख्यंत्री अजित पवारांनी जोरदार टीका केली आहे. अजित पवार यांच्या टीकेला रोहित पवार यांनी सोशल मीडियावरुन प्रत्युत्तर दिलं आहे.  

आकाश नेटके | Updated: Dec 2, 2023, 11:08 AM IST
'अजिबात खपवून घेणार नाही'; संघर्ष केला नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना रोहित पवारांचे प्रत्युत्तर title=

Maharashtra Politics : राष्ट्रवादीच्या (NCP) वैचारिक मंथन बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत. 1 मे रोजी मला शरद पवारांनी बोलवून सांगितलं की आता सरकारमध्ये जा. मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो, असा अजित पवार यांनी म्हटलं. यासोबत अजित पवार यांनी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावरही टीका केली होती. काहीजण आता गुडघ्याला बाशिंग बांधून संघर्ष यात्रा काढत आहेत, असा टोला अजित पवार यांनी लगावला होता. त्यावर आता रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं आहे.

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट एकमेकांवर आरोप करत आहेत. अशातच कर्जत येथील राष्ट्रवादीच्या राज्यव्यापी शिबिरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक गौप्यस्फोट केले आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. यासोबत त्यांनी युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या रोहित पवार यांच्यावरही त्यांनी टीका केली. "काहीजण आता गुडघ्याला बाशिंग बांधून संघर्ष यात्रा काढत आहेत. अरे कसला संघर्ष? कधी आयुष्यात संघर्ष केला नाही आणि आता कशाचा संघर्ष?" असा खोचक सवाल अजित पवार यांनी केला होता. त्यावर रोहित पवारांनी एक पोस्ट लिहून प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हटलंय पोस्टमध्ये?

"आदरणीय अजित दादा, युवांच्या मागण्यांसाठी आम्ही सर्व युवा पुणे ते नागपूर असा 800 किमीचा पायी प्रवास करत असून नागरिकांशी संवाद साधत आम्ही आतापर्यंत 500 किमीचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे.आपल्या नजरेत आमचा हा संघर्ष लहान असला तरी ज्या मागण्यांसाठी आम्ही संघर्ष करत आहोत त्या मागण्या अत्यंत महत्वाच्या असून लाखो युवांच्या भविष्याशी निगडित आहेत आणि याच मागण्यांसाठी भविष्यात मोठ्या संघर्षाची देखील आमची तयारी आहे. युवांच्या, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना घेऊन चाललेल्या युवा संघर्ष यात्रेकडे राजकीय टीकेसाठी का होईना आपले लक्ष गेलेच आहे तर युवकांचे जे मुद्दे आम्ही घेऊन चाललो आहोत त्यांच्याकडेही थोडे लक्ष द्या. आपण माझ्यावर काहीही टीका करा, टीका मी पचवून घेईल परंतु युवांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर अजिबात खपवून घेणार नाही. तुमची कार्यक्षमता आणि तळमळ महाराष्ट्राने याआधीही पाहिली आहे,भाजपसोबत गेलात म्हणून ती कार्यक्षमता आणि तळमळ कमी झाली असल्याच्या चर्चा असल्या तरी युवांचे प्रश्न मार्गी लावून आपली खरी ताकद पुन्हा एकदा दाखवून द्या," असे रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

अजित पवार यांचा गौप्यस्फोट

"जर राजीनामा द्यायचा नव्हता तर दिला तरी कशाला, असास सवाल अजित पवार यांनी केला. पक्षाच्या खासदार व आमदारांनी २ जुलैला घेतलेला निर्णय आवडला नव्हता तर मग 17 जुलैला आम्हाला का बोलावले? पहिले मंत्र्यांना बोलवले, नंतर आमदारांना बोलवले नंतर सगळं सुरळीत होणार आहे असे सांगत होते. त्यावेळीही गाफील ठेवले गेले. 12 ऑगस्टला उद्याोगपतींच्या घरी बैठकीसाठी बोलावले. निर्णय घ्यायचा नव्हता तर गाफील का ठेवले," असा सवाल अजित पवार यांनी केला.