कृष्णात पाटील, झी 24 तास, मुंबई : शिवसेना विरुद्ध शिवसेना उभी फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे शिंदे गट आणि दुसरी उद्धव ठाकरे असे गट पडले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या गटातील अनेक नेते, आमदार आणि खासदार हळूहळू आता शिंदे गटामध्ये जात असल्याने मोठा धक्का बसला आहे.
आमदारांपाठोपाठ आता खासदारांनीही उद्धव ठाकरेंची साथ सोडल्याची चर्चा आहे. शिवसेनेतील खासदार आता शिंदे गटात जात असल्याची चाहुल लागताच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्ष वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केली आहे.
उद्धव ठाकरे आज सायंकाळी सर्व जिल्हाप्रमुख आणि विभागप्रमुखांशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत. लोकप्रतिनिधी गेले तरी संघटनात्मक पातळीवर मात्र पक्ष मजबूत ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंचा रोज बैठकांचा सपाटा सुरू केला आहे. महिन्याभरात जिल्हाप्रमुखांशी चौथ्यांदा संवाद साधणार आहेत.
काही नियमित बैठकांसाठी उद्धव ठाकरे एक वाजता सेना भवनलाही उपस्थित राहणार आहेत. मुंबईच्या पश्चिम उपनगराचील उत्तर भारतीय एकता मंच आणि शिवसेना व्यापारी संघटनांची आज शिवसेना भवनात बैठक घेण्यात येणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित राहून करणार मार्गदर्शन करणार असल्याची माहिती मिळाली आहे.