Bjp Minister Resign: राज्याच्या राजकारणात गेल्या वर्षभरापासून मोठे ट्वीस्ट अॅण्ड टर्न पाहायला मिळत आहेत. शिवसेनेच्या 40 आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्याला वर्ष उलटत नाही तोवर राष्ट्रवादीच्या आमदारांनीही अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत जाण्याला पसंती दिली. त्यामुळे आता भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सरकार सत्तेत आहे. यात राष्ट्रवादीच्या नव्याने आलेल्या आमदारांनी मंत्रीपदाची शपथ देखील घेतली आहे. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळाला. यात आता भाजपचे मंत्री राजीनामा देणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. तसेच शिंदे गटाच्या आमदारांनाही राजीनामा देण्याचे सांगण्यात आले अशी माहिती समोर येत आहे.
भाजपाचे दोन ते तीन मंत्री राजीनामा देणार असल्याची माहिती समोर येत आहे. भाजपच्या वरिष्ठांकडून मंत्र्यांना अशाप्रकारच्या सूचना देण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
या मंत्र्यांच्या जागेवर भाजपच्या नवीन आमदारांना संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
आपल्या मंत्री पदाच्या कार्यकाळात प्रभावी काम न करु शकलेल्या मंत्र्यांना राजीनामा देऊन त्याजागी नवीन आमदारांना संधी दिली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दुसरीकडे एका घरात 2 मंत्रीपद दिली जाणार नाहीत याची काळजी देखील भाजपकडून घेतली जात असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
अजित पवार यांनी आपल्या आमदारांसोबत मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर शिंदे गटातील मंत्रीपदासाठी इच्छुक आमदारांमध्ये आधीच चलबिचल पाहायला मिळाली. शिंदे गटातील 2 ते ३ आमदार बदली करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. असे असले तरीही शिंदे गटातील हे मंत्री राजीनामा देण्यासाठी तयार नाहीत अशी माहितीही समोर येत आहे.