BJP MNS Allience : भाजप-मनसे युती करणार?, प्रदेशाध्यक्षांचा खुलासा

शिवसेना-संभाजी ब्रिगेडनंतर राज्यात नव्या राजकीय समीकरणाांची नांदी, मनसे-भाजप एकत्र?

Updated: Aug 30, 2022, 04:37 PM IST
 BJP MNS Allience : भाजप-मनसे युती करणार?, प्रदेशाध्यक्षांचा खुलासा   title=

मुंबई : राज्यातील सत्तांतरानंतर (Maharashtra Political Crisis) राजकीय समीकरणं बदलताना दिसत आहेत. मुंबई पालिका निवडणुकीच्या (BMC Election 2022) पार्श्वभूमीवर सर्व पक्ष तयारीला लागलेत. शिवसेनेनेही संभाजी ब्रिगेडसोबत (Shiv Sena Sambhaji Brigade) हातमिळवणी करत युती केली. त्यानंतर आता नव्या समीकरणांची नांदी पहायला मिळण्याची शक्यता आहे. (maharashtra political bjp state president chandrashekahr bawankule told on alliance with mns)

भाजपचे महत्त्वाच्या नेते शिवतीर्थाच्या पायऱ्या चढत आहे. त्यामुळे भाजप-मनसे युतीच्या दबक्या आवाजात चर्चा होताना दिसत आहेत. अशातच भाजप प्रदेशाध्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.  

युतीबाबत आमचे दिल्लीतील आणि वरिष्ठ नेते निर्णय घेतील, माझ्याकडे फक्त पक्षवाढीचं काम आहे. मनसे आणि भाजपमध्ये वैचारिक साम्य आहे, महाराष्ट्र आणि हिंदुत्त्वाचं रक्षण करण्यासाठी जे नेतृत्त्व राज्यात असेल त्यांना भेटण्यात काही अडचण नाही आणि आमचे परिवारिक संबंध असल्याचं बावनकुळे म्हणाले. बावनकुळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

राज ठाकरेंनी सागर बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. तर संध्याकाळी राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी जाऊन भेट घेतली. आज बावनकुळेंच्या भेटीमुळे आता भाजप आणि मनसेत नेमकं शिजतंय काय अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

राजकीय सत्तांतरामुळे राज्यातील वातावरण अस्थिर झालं आहे. याचाच फायदा घेण्यासाठी भाजप मनसेलासोबत घेऊन निवडणुकीची तयारी करत असल्याचं दिसत आहे. राज ठाकरेंच्या वक्तृत्त्वामुळे भाजपलाही प्रभावीपणे निवडणुकीचे मुद्दे मांडता येऊ शकतात. याचा  फायदा भाजपलाही होऊ शकतो. त्यामुळे भाजप नेत्यांच्या भेटीला मोठं महत्त्व आलं आहे.