मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात भावी पोलिसांची वाईट अवस्था, कडाक्याच्या थंडीत फुटपाथवर झोपून काढावी लागली रात्र

मुंबईसह राज्यात थंडीचा कडाका वाढला, राज्याच्या कानाकोपऱ्यातून पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची (Maharashtra, Police Recruitment) वाईट अवस्था

Updated: Jan 16, 2023, 02:23 PM IST
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात भावी पोलिसांची वाईट अवस्था, कडाक्याच्या थंडीत फुटपाथवर झोपून काढावी लागली रात्र title=

Maharashtra Police Recruitment : राज्यात सध्या पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु आहे. राज्यभरातून हजारो उमेदवार यासाठी ठाण्यात (Thane) आले आहेत. सोमवारी चाचणी होणार असल्याने आदल्या दिवशीच अनेक उमेदवार (Candidate) ठाण्यात दाखल झाले. सातारा, सांगली, कराड, जालना,परभणी इत्यादी ठिकाणाहून आलेल्या या तरुणांमधीलच काही जण उद्याचे भावी पोलिस अधिकारी आहेत. पण या भावी पोलिसांना कडाक्याच्या थंडीत चक्क उघड्यावर झोपावं लागलं. 

राज्याच्या कानाकोपऱ्यातून तरुण ठाण्यात
पोलीस दलामध्ये भरती होण्याचं स्वप्न उराशी बाळगून हे तरुण पोलीस भरतीच्या मैदानी परीक्षेसाठी (Ground Test) ठाण्यात आले आहेत. पण त्यांना संपूर्ण रात्र मैदानाच्या बाहेरच रात्रीच्या कुडकुडत्या थंडीतच काढावी लागलीय. जवळपास 100 भावी पोलीस अधिकारी हे पोलीस भरतीच्या मैदानाच्या बाहेरच असलेल्या रात्रीच्या कुडकुडत्या थंडीत झोपले होते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या या तरुणांसाठी निवाऱ्याची कोणतीही सोय उभारण्यात आली नव्हती. 

वरिष्ठ अधिकार भरतीसाठी निवाऱ्याची सोय
विशेष म्हणजे जिल्ह्यातील इतर ठिकाणी वरिष्ठ अधिकार पदाची भर्ती सुरु असून या भरतीसाठी आलेल्या तरुणांना निवासाची सोय करण्यात आली होती. ठाणे शहरात मात्र या विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय केली नसल्याचं काही विद्यार्थ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं. मात्र याबद्दल या उमेदवारांनी कसलीही तक्रार न करता सकाळी होणाऱ्या चाचण्यांसाठी तयार असल्याचं सांगितलं.दरम्यान याबद्दल पोलिस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता रात्रीच्या सुमारास संपर्क होऊ शकला नाही.

मुंबईत निचांकी तापमानाची नोंद
दरम्यान, मुंबईत काल यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आलीय (Cold Wave in Mumbai). कमाल तापमानातही घसरण झाल्यामुळे मुंबईत काल दिवसभर गारठा जाणवत होता. उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे तापमानात घट झालीय. आणखी 3 दिवस मुंबईत थंडीचा मुक्काम असण आहे.  मुंबईला हुडहुडी भरली असताना हवा प्रदूषणातही वाढ झालीय. त्यामुळे रविवारी मुंबईला धुरक्यानं वेढलं होतं. हवेचा दर्जा वाईट या श्रेणीत नोंदवण्यात आला. वाऱ्याचा वेग मंदावल्यानं दक्षिण आणि मध्य मुंबईतील हवेची श्रेणी वाईट स्थितीत आहे. वांद्रे-कुर्ला संकुल, चेंबूर, अंधेरी इथली हवा अत्यंत वाईट श्रेणीत असल्याची नोंद करण्यात आलीय.