जीवंतपणी माझा फोटो कुणी वापरावा हा माझा अधिकार; शरद पवार यांनी बंडखोरांना ठणकावले

'ज्यांनी द्रोह केला, त्यांनी फोटो वापरू नये' अशी  सक्त ताकीद शरद पवारांची बंडखोरांना दिली आहे. परवानगीशिवाय फोटो वापरु नका असा इशारा देखील पवारांनी दिला आहे.  

वनिता कांबळे | Updated: Jul 4, 2023, 04:57 PM IST
जीवंतपणी माझा फोटो कुणी वापरावा हा माझा अधिकार; शरद पवार यांनी बंडखोरांना ठणकावले  title=

Sharad Pawar On Ajit Pawar:  अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेत शिंद फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. अजित पवार यांचा मोठा गट शिंद फडणवीस सरकार मध्ये सामील झाला आहे. यामुळे राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली. महाराष्ट्रात काका पुतण्याचा वाद चांगलाच पेटला आहे. राष्ट्रवादी आमचीच असल्याचा दावा अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला आहे. तर, दुसरीकडे अजित पवार देखील चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसत आहे. जीवंतपणी माझा फोटो कुणी वापरावा हा माझा अधिकार आहे असं म्हणत राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी बंडखोरांना चांगलेच ठणकावले आहे. 

कुणीही माझा फोटो वापरू नये - शरद पवार

ज्यांनी माझ्या विचारांशी द्रोह केला. ज्यांच्याशी माझा आता वैचारिक मतभेद आहेत. त्यांनी माझा फोटो माझ्या परवानगीनेच वापरावा. जीवंतपणी माझा फोटो कुणी वापरावा हा माझा अधिकार आहे. त्यामुळे मी ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे.ज्यांचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आहे. त्या पक्षाने माझा फोटो वापरावा. अन्य कुणीही माझा फोटो वापरू नये असा इशारा शरद पवार यांनी अजित पवार गटाला दिला आहे.

अजित पवार यांचे थेट शरद पवारांना आव्हान

अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस आमचीच, पक्ष आणि चिन्ह आमच्याबरोबर आहे असं म्हणत अजित पवारांनी थेट शरद पवारांना आव्हान दिले आहे. मात्र, त्याचवेळी शरद पवार राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, हे विसरलात का, असा प्रश्नही अजित पवारांनी या पत्रकार परिषदेत केला. 

शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा यासंदर्भात पेच

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी विधीमंडळासमोर धाव घेतली आहे.  विधानसभा अध्यक्ष कार्यालयात राष्ट्रवादीचे 7 ते 8 अर्ज दाखल झालेत. त्यातल्या याचिका आणि तक्रार अर्ज तपासल्यानंतर अध्यक्ष पुढची कार्यवाही करणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.  शिवसेना प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल पाहून पुढची कार्यवाही करण्याचं विधीमंडळासमोर आव्हान आहे. शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा यासंदर्भात पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलंय. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आणि विरोधात अशा दुहेरी भूमिकेत असल्याने नवा पेच आहे. नेमका पक्ष कुणाचा? यावर निर्णय घेण्याचे अध्यक्षांसमोर आव्हान असेल.