नांदेडच्या शेतकऱ्याने 30 हजारात पिकवली वांगी, 2 महिन्यात कमावले लाखो रुपये, 'हा' फॉर्म्युला चर्चेत

Success Story: पाच एकर जमिनीतील दीड एकरावर वांग्याची शेती घेतली. ३० हजार रुपये खर्च केले पण शेतकऱ्याला आलेला नफा डोळे दिपवणारा. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 17, 2023, 01:04 PM IST
 नांदेडच्या शेतकऱ्याने 30 हजारात पिकवली वांगी, 2 महिन्यात कमावले लाखो रुपये, 'हा' फॉर्म्युला चर्चेत title=
maharashtra nanded farmer earn three to four lakh rupees from brinjal crop

Maharashtra Farmer Success Story: मेहनत करण्याची तयारी असेल आणि अंगात जिद्द अशेल तर कोणतीच गोष्ट अशक्य नसते. महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्याने हे दाखवून दिलं आहे. शेतीतून उत्पन्न मिळत नाही, असं म्हणत शेती सोडून शहराची वाट धरणाऱ्या तरुणांना या शेतकऱ्याकडून धडा घेण्याची गरज आहे. अवघे 30 हजार रुपये खर्चून शेतात पिक घेतले. मेहनतीच्या आणि कौशल्याच्या जोरावर शेतीमालाला लाखो रुपयांचा भाव मिळवून दिला आहे. निरंजन सरकुंडे असं या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. 

नांदेड जिल्ह्यात हदगाव तालुक्यात येणाऱ्या जांभाळा गावातील निरंजन हे सामान्य शेतकरी आहेत. त्यांनी केवळ दीड एकर जमिनीत वांग्याचे पिक घेतले. गेल्या तीन वर्षांपासून ते वांग्याची पिकाची काळजी घेत आहेत. आज अखेर त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले आहे. तीस हजार रुपये खर्चून त्याने आत्तापर्यंत लाखो रुपयांचा नफा कमावला आहे. 

निरंजन सरकुंडे यांच्याकडे पाच एकर जमीन आहे. यापूर्वी निरंजन त्यांच्या शेतात पारंपारिक पिक घेत होते. मात्र, त्यातून फारसे उत्पन्न येत नव्हते. त्यामुळं त्यांनी दुसरा पर्याय वापरला. पाच एकर शेतातील दीड एकर जागेत त्यांनी वांग्यांची शेती करण्याचे ठरवले. सरकुंडे यांच्या गावाशेजारील एका शेतकऱ्यानेही हा पर्याय वापरला होता. त्यावेळी त्यांना दुप्पट नफा झाला होता. त्यानंतर निरंजन यांनीही शेतात भाज्यांचे उत्पन्न घेण्याचे ठरवले. 

निरंजन यांनी दोन बाय बायचा वाफे तयार करुन लावली होती. मात्र, गावात पाण्याची टंचाई होती. त्यामुळं पाण्याची बचत करण्यासाठी त्यांना ठिबकचा वापर करुन योग्य नियोजन केले. त्यानंतर दोन महिन्यात वांगी काढणीची वेळ आली. काढणी झाल्यानंतर गावाशेजारीच असलेल्या उमरखेड आणि भोकरच्या आसपासच्या बाजारपेठेत त्यांची वांगी विकली जातात. निरंजन सरकुंडे यांनी दीड एकर जागेत घेतलेले वांग्याचे उत्पन्नातून सुमारे तीन लाखांचा निव्वळ नफा कमावला आहे. भाजीपाला वागवड स्वस्त झाल्याने जांभळा गावातील शेतकरीही भाजीपाला लागवडीकडे वळू लागले आहेत. 

अल्पभूधारक शेतकरी निरंजन सरकुंडे यांच्या वांग्याला स्थानिक बाजारपेठेत चांगली मागणी आहे. भाजीपाला इतर ठिकाणी न पाठवता ते स्थानिक बाजारात विकतात. 

दरम्यान, टोमॅटोच्या किमतीतही वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात एक किलो टोमॅटोसाठी 150 ते 180 रुपये प्रतिकिलो भाव मिळतोय. भाव वाढल्याने शेतकरी आता टोमॅटोच्या शेतीकडे वळत आहेत. नांदेड जिल्ह्यात खरीप पेरणीबरोबरच शेतकरी भाजीपाला लागवडही करत आहेत. टोमॅटोचे भाव वाढल्याने आता टोमॅटोच्या उत्पादनातून चांगला आर्थिक फायदा होईल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.