असं कुठं असतं का राव! मित्राला घरी जेवायला बोलावलं, दोन मिनिटासाठी गेला बाहेर आणि...

आपल्या मित्राला जेवायला घरी बोलावत त्याच्याच घरी जाऊन चोरी केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी चोरी करणाऱ्या मित्राला अटक केली आहे. कैलाश निमजे असं चोरट्याचं नाव आहे.  ही घटना नागपूरमधील आहे.

Updated: Aug 22, 2022, 05:21 PM IST
असं कुठं असतं का राव! मित्राला घरी जेवायला बोलावलं, दोन मिनिटासाठी गेला बाहेर आणि... title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : आपल्या मित्राला जेवायला घरी बोलावत त्याच्याच घरी जाऊन चोरी केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी चोरी करणाऱ्या मित्राला अटक केली आहे. कैलाश निमजे असं चोरट्याचं नाव आहे.  ही घटना नागपूरमधील आहे.

नेमकं काय घडलं? 
बीएसएनएलमध्ये कार्यरत असलेल्या गणेश पौनीकरला बिनाकी मंगळवारी इथं राहणाऱ्या त्याचा मित्र कैलास निमजेने कृष्ण जन्माष्टमी निमित्त घरी जेवणासाठी बोलवलं होतं. संध्याकाळी गणेश पौनीकर आणि त्याची पत्नी जेवणासाठी कैलासच्या घरी जातात. त्यानंतर काही वेळासाठी कैलास बाहेर जाऊन आलो म्हणतो आणि गणेशच्या घरात चोरी करून येतो.

जेवण करून गणेश आणि त्याची पत्नी घरी जातात तेव्हा त्यांना धक्का बसतो. गणेश यांच्या घरी चोरी झालेली असते. घरातील काही दागिने आणि मुद्देमाल चोरीला गेलेला असतो. त्यानंतर गणेश पाचपावली पोलिसात धाव घेत या चोरीबाबत तक्रार दाखल करतात.

असा झाला उलगाडा- 
पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेराच्या आधारे तपास सुरू केला. यावेळी पोलिसांना दुचाकीवरून संशयित आरोपी जाताना दिसले. पोलिसांनी संशयिताचा शोध घेत ताब्यात घेतलं. तो संशयित दुसरा तिसरा कोणी नाहीतर कैलास असल्याचं दिसलं. पोलिसांनी कैलासला ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी केली. 

कैलास सुरूवातीला काही बोलला नाही मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने चोरीच्या घटनेची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चार लाख 66 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. फ्लॅटसाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी त्याने गणेशच्या घराची बनावट चावी तयार करून चोरी केल्याचे त्याने कबूल केलं. 

एकीकडे अडचणीच्या वेळेस धावून येणाऱ्या मित्रांची अनेक उदाहरणे आपल्यासमोर येत असताना. मात्र मित्राला जेवायला बोलून त्याच्याच घरी चोरी करण्याच्या नागपुरातील या घटनेमुळे मैत्रीच्या नात्याला कलंक लागला आहे.