Devendra Fadnavis on LokSabha Result: लोकसभा निवडणुकीतील अनपेक्षित कामगिरीनंतर मला सरकारमधून मोकळं करा म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी आज भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण अमित शाह यांची भेट घेऊन याबद्दल सांगितलं असल्याचा खुलासा केला. तसंच यशाचे बाप अनेक असतात, पण अपयश ताकदीने अंगावर घ्यायचं असतं, पचवायचं असतं आणि निर्धार करायचा असतो अशा शब्दांत कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्यास सांगितलं आहे. आपण तीन पक्षांसाठी तयारी केली होती. पण चौथ्या पक्षासाठी तयारीच केली नाही सांगत ते आपल्या अपयशाचं मुख्य कारण असल्याचं ते म्हणाले.
"नव्याने पेरणी करण्याची वेळ आली आहे. यशाचे बाप अनेक असतात, पण अपयश ताकदीने अंगावर घ्यायचं असतं, पचवायचं असतं आणि निर्धार करायचा असतो. मला मोकळं करा असं सांगितलं तेव्हा ते निराशेतून बोललो नाही. देवेंद्र फडणवीस हा पळणारा नव्हे तर लढणारा व्यक्ती आहे. चारी बाजूने घेरलयानंतर पुरंदरचा तह करणारे आणि पुन्हा ताकदीने सर्व किल्ले जिंकणारे छत्रपती शिवाजी महाराज आमचे प्रेरणा आहेत. त्यामुळे कोणाला मी निराश झालो असं वाटत असेल तर ते सत्य नाही. माझ्या डोक्यात काही रणनीती आहे. मी अमित शाह यांना भेटून डोक्यात काय आहे हे सांगितलं. त्यांचीही भूमिका तुमच्यापेक्षा फार काही वेगळी नव्हती. त्यांनी सध्या आहे तसं काम सुरु राहू दे, आपण नंतर महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट तयार करु असं सांगितलं. पण कोणत्याही स्थितीत मी शांत बसणार नाही," असा निर्धार देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
"महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 43.9 टक्के आणि महायुतीला 43.6 टक्के आहेत. फक्त .3 टक्के इतकं अंतर आहे. पण त्याचा परिमाण तिकडे 31 आणि इकडे 17 आहेत. महाविकास आघाडीला 2 कोटी 50 लाख, आपल्याला 2 कोटी 48 लाख मतं मिळाली आहेत. 2 लाख मतं जास्त मिळाली आहेत. मुंबईत त्यांना 24 लाख आणि आपल्याला 26 लाख मतं आहेत. पण त्यांना 4 आणि आपल्याला 2 जागा मिळाल्या आहेत. आपण केवळ तीन पक्षांशी लढत नव्हतो. चौथा पक्ष खोटा नरेटिव्ह होता. या 3 पक्षांना रोखलं तर यशस्वी होईल असं आपल्य़ाला वाटलं होतं. पण चौथ्या पक्षासाठी आपण तयारीच केली नाही. त्यामुळे त्याला रोखू शकलं नाही. संविधान बदलणार हा विषय खालपर्यंत गेला आणि आपण तो नीट खोडू शकलो नाही. ते जे खोटं बोलत होते ते सामान्य माणसाला खरं वाटू लागलं होतं," असा दावा त्यांनी केला.
"देशात मोदींना जनतेने समर्थन दिलं, तिसऱ्यांदा एनडीएचं सरकार आलं. त्याचवेळी ओडिशात आपलं सरकार येणं. आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेशात सरकार येणं हे स्पष्टपणे काय सांगत आहेत हे पाहिलं पाहिजे. काही लोक विजयाचा नरेटिव्ह तयार करतात. तीन निवडणुका मिळून त्यांना जितक्या जागा मिळाल्या त्या एकाच निवडणुकीत एनडीएला मिळाल्या. इंडिया आधाडीला मिळाल्या त्यापेक्षा जास्त जागा भाजपाला मिळाल्या," असं देंवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.
"मराठा समाजाने नरेटिव्ह तयार केला. आपण दोन्ही वेळा आरक्षण दिलं. सारथी, फी सवलती, या सगळ्या गोष्टी आपल्याच काळात झाल्या. 1980 पासून ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांच्या पारड्यात मतं गेली आहेत. याचा अर्थ हे पण टिकणार नाहीत. नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यात ते यशस्वीही झाले. पण जास्त यशस्वी झाले नाहीत अन्यथा 43.6 टक्के मतं मिळाली नसती. आपल्याला 2019 पेक्ष कमी मतं मिळालेली नाहीत," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पुढे त्यांनी सांगितलं की, "महाराष्ट्राला आपण गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर आणलं. उद्धव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्र खालच्या क्रमांकावर होता. पण आपण दिल्ली, गुजरात, कर्नाटक यांची एकत्रित बेरीज केली तरी जास्त गुंतवणूक आणली. पण असं असतानाही रोज खोटं बोलायचं आणि नरेटिव्ह तयार करायचं काम केलं. उद्धव ठाकरेंना ठाण्यापासून कोकणापर्यंत एकही जागा मिळालेली नाही. मुंबईच्या जागा ज्या मिळाल्या त्या कोणाच्या भरवशावर मिळालेल्या नाहीत. मराठी माणसाने मत दिलं असतं दक्षिण मुंबईत, वरळीत फक्त 6 हजारांचा लीड आहे. मराठी माणूस यांच्यासोबत गेला नाही. त्यांनी केवल एका विशिष्ट समाजाच्या मतांवर ते आघाडी घेत निवडून आले".
"आपण 5 टक्क्यांहून कमी मताने हारलो अशा 11 जागा आहेत. जर त्यांना 31 जागा मिळाल्या तर ते विधानसभेतही दिसायला हवं होतं. विधानसभेत महायुतीला 130 जागांवर आघाडी आहे. भाजपाबद्दल विचार कराचयचा देल्यास 71 जागांवर आघाडी आहे. ज्यांना लोकसभेच्या केवळ 9 जागा मिळाल्या ते महाराष्ट्रात सर्वाथानने एक नंबर आहेत," असंही त्यांनी सांगितलं.
पुढे ते म्हणाले "कधी कधी पराजय होतो. पण पराजय झाल्यावर एकमेकाच्या डोक्यावर खापर फोडू नका. आपली काही मतं आहेत. काही ठिकाणी समन्वयाचा अभाव आढलला. ते जाहीरपणे बोलण्याची गरज नाही. शेवटी आपली मदत मित्रपक्षाला झाली आहे. आपल्या लोकांनी मित्रपक्षाला मनापासून मदत केली आहे. ही जाहीरपणे उणे-धुणे काढण्याची वेळ नाही. एकमेकाला सोबत घेऊन चालणं महत्वाचं आहे. आता वेगवेगळी विश्लेषणं करु नका,. एका सूरात सर्वांनी बोललं पाहिजे. तक्रारी नेत्यांनी समजून घेतल्या पाहिजेत. या गोष्टी महायुतीसाठी योग्य नाहीत".
"विधानसभेत हे चित्र बदलणं कठीण नाही. खोट्या नरेटिव्हचा काळ आता संपला आहे. विधानसभेसाठी फक्त 3 ते 3.5 टक्के मतं बदलायची आहेत. पुन्हा एकदा आपण मैदान जिंकू याचा मला विश्वास आहे. मी निवडणूक संपल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो आहेत. जोपर्यंत महायुतीचा झेंडा फडकणार नाही, तोप्रयंत थांबणार नाही," असा निर्धार देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे.