मुंबई ते गोवा अन् चिपळूणमार्गे परतीचा प्रवास; कारचालकानं सांगितली रस्त्यांची A to Z अवस्था, हा अनुभव तुमच्यासाठी मदतीचा

Mumbai to Goa Via Chiplun : कोकणात आणि तिथून काहीसं पुढे गोव्यात रस्तेमार्गानं जायचा बेत आखत असाल तर आधीच वाचून घ्या कशी आहे रस्त्याची अवस्था...  

सायली पाटील | Updated: Dec 31, 2024, 08:54 AM IST
मुंबई ते गोवा अन् चिपळूणमार्गे परतीचा प्रवास; कारचालकानं सांगितली रस्त्यांची A to Z अवस्था, हा अनुभव तुमच्यासाठी मदतीचा  title=
Mumbai to Goa and back via Chiplun bike rider shares his own experiance on the road conditions of his konkan trip

Mumbai to Goa Via Chiplun : नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अनेक पर्यटनस्थळांवर प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. ही गर्दी टाळण्यासाठी अनेकांनीच जानेवारी महिन्याभरात अधेमधे एखाद्या छानशा ठिकाणी भेट देण्याचा बेत आखला आहे. यासाठीसुद्धा अनेकांचच प्राधान्य कोकण आणि तिथून काहीसं पुढे असणाऱ्या गोव्याला असून, इथं जाण्यासाठी विमानमार्गाचा पर्याय न निवडता खर्च वाचावा म्हणून रस्ते मार्गाचा पर्याय निवडला जात आहे. 

कोकणातून गोवा गाठण्याचा पर्याय निवडत असतानाच इथं रस्त्यांची नेमकी काय अवस्था आहे इथपासून कोणकोणते थांबे घ्यायचे इथपर्यंतची चर्चाही ओघाओघानं होतेच. असाच ये-जा करणारा प्रवास एका कारचालकानं केला आणि त्याचा अनुभव एका पोर्टलवर शेअरही केला. यासाठी त्यानं निवडलेला प्रवासमार्ग होता मुंबई →खोपोली → पाली →निझामपूर →माणगाव →खेड →चिपळूण →संगमेश्वर →साखरपा →राजापूर →गोवा

पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास सुरु झालेल्या या प्रवासाचा शेवट झाला गोव्यातील अंजुना इथं साधारण दुपारी 1.30 वाजता. अर्थ्या तासांच्या दोन थांब्यांसह हा प्रवास पूर्ण झाला. ज्यामध्ये महाडला चहानाश्त्यासाठीचा एक थांबा आणि साखरप्याला दुपारच्या जेवणासाठीचा एक थांबा होता. 

कशी आहे रस्त्यांची अवस्था? 

मुंबईपासून माणगाव आणि तिथून खोपोलीपर्यंत साधारण शहरी रस्त्यांची वाट असून, अंधुक प्रकाशात या रस्त्यांवर वाहनं चालवताना वाहन चालकानं सतर्क असणं गरजेचं असून, पाली ते माणगावदरम्यानच्या वाटेत अनेक तीव्र वळणं असल्यामुळं वेगमर्यादा राखणंही गरजेचं. लोणेरेच्या नजीक रस्त्यांवर पेव्हर ब्लॉक निघाल्यानं रस्त्यांची अवस्था काहीशी वाईट आहे. पण, लोणेरेपासून चिपळूणपर्यंत काही वळणं वगळता रस्ता समाधानकारक अनुभव देतो, इथं वाहन चांगल्या वेगावर संतुलित ठेवता येतं. 

चिपळूणमध्ये गेलं असता तिथं सर्विसरोडमुळं काहीशी वाहतूक कोंडी ओलांडत पुढे संगमेश्वर- देवरुख- साखरपा इथं रस्ताच एकपदरी होत असल्यामुळं वेग काहीसा मंदावतो. पण रस्ता सुस्थितीत असल्यामुळं वाहनाचा वेग प्रवास सुखावह करून जातो. या लहान रस्त्यांवरून पुन्हा एकदा NH66 वर आलं असता हा ठरतो तुमच्या प्रवासाचा शेवटचा टप्पा. 

हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : यंदाच्या वर्षातील शेवटचं हवामान वृत्त; आजचा दिवस बोचऱ्या थंडीचा की अवकाळीचा

प्रवासादरम्यान नेमकी काय काळजी घ्यावी?  

राजापूरनजीक या प्रवासादरम्यान अनेक सूचित न केलेले गतिरोधक असल्यामुळं 90 टक्के वाहनचालकांना त्यामुळं अडचण येते. गोव्याच्या वेशीपासूनच वाहनाचा वेग कमालीचा मंदावतो, हो पण हा मंदावलेला वेग तुम्ही गोव्यात आला आहात याचीच जाणीव करून देतो आणि हाच एक मोठा दिलासा असतो. 

साधारण 12 तासांच्या या प्रवासादरम्यान एक मोठा पल्ला ओलांडला असल्यामुळं प्रवास मोठा असला तरीही तो अनेकांसाठीच कमालीचा उत्साहपूर्ण अनुभव देऊन जातो असं म्हणणं गैर ठरणार नाही.