VidhanParishad Election 2024 : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी शुक्रवारी होणारी निवडणूक चुरशीची ठरणार आहे. कारण 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असून, सर्वच राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबर कसलीय... भाजपकडून पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे आणि योगेश टिळेकर असे 5 उमेदवार, शिवसेना शिंदे गटाकडून कृपात तुमाने आणि भावना गवळी असे 2 उमेदवार, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर असे 2 उमेदवार, काँग्रेसकडून प्रज्ञा राजीव सावत, शिवसेना ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पाठिंब्यावर शेकापचे जयंत पाटील असे एकूण 12 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. या निवडणुकीचं नेमकं गणित काय असणाराय, ते समजून घेऊया.
विधानपरिषद निवडणुकीत 274 आमदार मतदान करणार आहेत. एका उमेदवाराला विजयासाठी 23 मतांचा कोटा निश्चित करण्यात आलाय. महायुतीकडे 197 आमदारांचं संख्याबळ असून, त्यांचे 9 उमेदवार रिंगणात आहेत. महाविकास आघाडीकडे 69 आमदाराचं संख्याबळ असून, त्यांचे 3 उमेदवार रिंगणात आहेत. आता प्रत्येक पक्षाचं संख्याबळ किती आणि कुणाला किती मतं कमी पडतायत, ते पाहूया..
कसं असेल भाजपचं गणित?
भाजपकडे 103 आमदार आहेत. 5 उमेदवार निवडून आणण्यासाठी 115 मतांची गरज आहे. वरच्या 12 मतांसाठी भाजपला मित्रपक्ष आणि अपक्षांवर अवलंबून राहावं लागणाराय. 5 अपक्ष आमदार आणि इतर 7 आमदारांनी भाजपच्या पारड्यात मतं टाकल्यास भाजपचे पाचही उमेदवार जिंकू शकतात, असा अंदाज आहे.
शिवसेना शिंदे गटाचं गणित
शिवसेना शिंदे गटाकडे 38 आमदार आहेत. 2 उमेदवार निवडून आणण्यासाठी 46 मतांची गरज आहे. वरच्या 9 मतांसाठी शिवसेना शिंदे गटाला तजवीज करावी लागणाराय. 6 अपक्ष आमदार आणि बच्चू कडूंच्या पक्षाच्या 2 आमदारांची मतं मिळाल्यास मुख्यमंत्र्यांचे दोन्ही उमेदवार विजयी होऊ शकतील, अशी शक्यता आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचं गणित
राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे 40 आमदार आहेत. 2 उमेदवार निवडून आणण्यासाठी 46 मतांची गरज आहे. अजितदादांच्या पक्षाला वरच्या 6 मतांची तजवीज करावी लागणार आहे. 3 इतर आमदारांचं पाठबळ त्यांना असल्याचं समजतंय. आणखी 3 मतं ते कुठून आणणार, हा प्रश्न आहे.
काँग्रेसचा पेपर सोपा
महाविकास आघाडीत काँग्रेसकडे सर्वाधिक 37 आमदार आहेत. त्यामुळं प्रज्ञा राजीव सातव पहिल्याच फेरीत निवडून येऊ शकतात. काँग्रेसकडे अतिरिक्त 14 मतं आहेत. ही मतं काँग्रेस कुणाच्या पारड्यात टाकणार, यावर शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराचं भवितव्य अवलंबून असणार आहे.
शिवसेना ठाकरे गटाचं गणित
शिवसेनेकडे विधानसभेचे केवळ 15 आमदार आहेत. मिलिंद नार्वेकर यांच्या विजयासाठी 8 मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. काँग्रेसची अतिरिक्त 14 मतं नार्वेकरांच्या पारड्यात पडल्यास ते सहज निवडून येऊ शकतील. नार्वेकरांचे सर्व पक्षांच्या नेत्यांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळं इतरांची मतं आपल्याकडे वळवण्यात ते कितपत यशस्वी होतात, याकडंही लक्ष असणार आहे.
शेकापचं (राष्ट्रवादी) गणित
राष्ट्रवादी शरद पवार गटानं शेकापच्या जयंत पाटलांना पाठिंबा दिलाय. शरद पवार गटाचे 12 आमदार आहेत. जयंत पाटलांना विजयासाठी 14 मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. त्यामुळं जयंत पाटलांना निवडून आणताना महाविकास आघाडीचं सगळं कौशल्य पणाला लागणार आहे.
दरम्यान, 2022 साली झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाला होता. सत्ता नसतानाही भाजपनं महाविकास आघाडीच्या आमदारांची मतं फोडून आपले उमेदवार निवडून आले होते. आताही क्रॉस व्होटिंग होण्याची भीती सगळ्याच राजकीय पक्षांना आहे. त्यामुळं एमआयएम, बहुजन विकास आघाडी, समाजवादी पार्टी, स्वाभिमानी पक्ष, माकप आणि इतर अपक्ष आमदारांचा भाव चांगलाच वधारलाय. त्यामुळं विधानपरिषद निवडणुकीत नेमका कुणाचा गेम होणार, याचा तर्क लढवणं अवघड झालंय.