'उद्धव ठाकरेंची रणनिती वगैरे म्हणण्याची...'; नार्वेकरांच्या विजयानंतर मनसेचा खोचक टोला

Maharashtra Legislative Council Election 2024 Result: विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने तिसरा उमेदवार लढवण्याचा डाव त्यांच्या अंगलट आल्याचं पाहायला मिळालं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 13, 2024, 07:30 AM IST
'उद्धव ठाकरेंची रणनिती वगैरे म्हणण्याची...'; नार्वेकरांच्या विजयानंतर मनसेचा खोचक टोला title=
सोशल मीडियावरुन केली टीका

Maharashtra Legislative Council Election 2024 Result: विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये महायुतीचे 9 उमेदवार जिंकून आले आहेत. या निवडणुकीमध्ये 11 जागांसाठी 12 उमेदवार उभे होते. त्यामुळे फटका कोणाला बसणार? गेम कोणाचा होणार? याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरु होती. महाविकास आघाडीचे 2 उमेदवार निवडून आले. तिसऱ्या जागी महाविकास आघाडीला यश आलं नाही. मात्र उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकरही निवडून आले आहेत. त्यांना पहिल्या पसंतीची 2200 मतं मिळाली. मिलिंद नार्वेकरांच्या विजयानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना श्रेय देणाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

सोशल मीडियावर टीका

मिलिंद नार्वेकर यांनी विजय मिळवल्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्यांकडून हा विजय म्हणजे उद्धव ठाकरेंच्या रणनीतीचा परिणाम असल्याचा दावा केला जात आहे. मात्र या विधानावरुन मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सोशल मिडीयावरुन ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. "मिलिंद नार्वेकरांचा विजय हे त्यांचं वैयक्तिक श्रेय आहे.उगीचच त्याचे श्रेय कोणी घेण्याचा प्रयत्न करू नये," अशी पोस्ट संदीप देशपांडेंनी केली आहे. 

नेमकं काय म्हणाले ते?

आपल्या पोस्टसंदर्भात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संदीप देशपांडेंनी भूमिका स्पष्ट केली. "यापूर्वी कोणी जबाबदारी घेतलेलं मला ठाऊक नाही मात्र आता सगळे चालू होतील. मला ज्या पद्धतीने मिलिंद नार्वेकर माहितीयेत त्यानुसार त्यांचा हा विजय म्हणजे त्यांचे सर्वांशी असलेल्या चांगल्या संबंधांमुळे झाला आहे. आता उगाचच ठाकरेंची रणनिती, ठाकरे चाणक्य, उद्धव ठाकरेंची रणनिती वगैरे म्हणण्याची गरज नाही. हा जो विजय आहे त्याचं श्रेयही त्यांचं (नार्वेकरांचं) आहे. पराभव झाला असता तरी पराभवही त्यांचाच होता," असं मत व्यक्त केलं. तसेच पुढे बोलताना, "श्रेय घेताना सर्वजण येतात. त्यामुळे मी ट्वीट करुन म्हटलं की या विजयाचं श्रेय जर कोणाचं असेल तर ते मिलिंद नार्वेकरांचं आहे. हे श्रेय दुसऱ्या तिसऱ्या कोणाचं नाही," असंही संदीप देशपांडे म्हणाले.

सकाळपासूनच विधानसभेच्या गेटवर

मिलिंद नार्वेकरांच्या विजयानंतर शिवसैनिकांनी गुलाल उधळून सेलिब्रेशन केलं. मिलिंद नार्वेकरांनी आपल्या विजयानंतर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. सकाळपासूनच मिलिंद नार्वेकर हे विधानसभेच्या गेटवरच ठाण मांडून होते. येणाऱ्या प्रत्येक आमदाराशी ते हस्तांदोलन करुन संवाद साधताना दिसले. ठाकरे गटाने या निवडणुकीमध्ये एकमेव उमेदवार दिला होता. त्यामुळेच नार्वेकरांची उमेदवारी हा ठाकरेंसाठी प्रतिष्ठेचा मुद्दा झाला होता.