Maharastra Politics : 'गद्दारांना महाराष्ट्र धडा शिकवेल...', जितेंद्र आव्हाडांची फुटीर आमदारांवर सडकून टीका

Jitendra Awhad On Vidhan Parishad Election results : विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची 7 ते 8 मतं फुटली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर सडकून टीका केलीये.

सौरभ तळेकर | Updated: Jul 13, 2024, 12:15 AM IST
Maharastra Politics : 'गद्दारांना महाराष्ट्र धडा शिकवेल...', जितेंद्र आव्हाडांची फुटीर आमदारांवर सडकून टीका title=
Jitendra Awhad On Vidhan Parishad Election results 2024

Maharastra Politics : विधानपरिषद निवडणुकीत निकालांतून (MLC Election Results) काँग्रेस पक्षाची सात ते आठ मतं फुटल्याचं समोर आलं आहे. मागील विधानपरिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election Results 2024) जे झालं, तेच या निवडणुकीत देखील झाल्याचं दिसून आलं. अशातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी फुटीर आमदारांना धडा शिकवू, असं स्पष्ट शब्दात म्हटलं आहे. यावेळीही कमिटी वगैरे काही नाही, थेट कारवाई करणार असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलंय. काँग्रेसची मत फुटल्याचं फटका राष्ट्रवादीला बसला. राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर उभ्या असलेल्या शेकापच्या जयंत पाटील यांना पराभवला सामोरं जावं लागलं. अशातच आता जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) देखील संताप व्यक्त केला आहे.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

आज विधानपरिषदेच्या निवडणुकीत (Vidhan Parishad Election Results) जी काही मते फुटली किंवा फोडण्यात आली, त्याचे एकमेव कारण म्हणजे पैसा आणि विकासनिधी. म्हणजे जनतेच्याच पैशाचा खेळ! विकासनिधी हा कुणी स्वतःच्या घरातून आणत नाही. जनतेच्या करातून सरकारी तिजोरीत जमा झालेला पैसा हा विकासनिधी म्हणून वापरला जातो. पण, या सरकारने तेही जमविले नाही. या सरकारने फक्त कर्जाचा डोंगर उभा केला अन् त्या कर्जाच्या डोंगरातूनच हे पैसे काढले जात आहेत. म्हणजेच, जनतेच्याच खिशाला कात्री लावण्याचे काम केले जातेय, असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलाय.

पाच कोटी रूपये आणि शंभर कोटी रूपयांची कामे, अशी ऑफर प्रत्येक आमदाराला दिली जात होती. काही पैशांच्या अमीषाला बळी पडले. स्वतःच्या राजकीय अस्तित्वाविषयी काळजी नाही; स्वतःच्या राजकारणाविषयी पुढे जाण्याची इच्छा नसेल तर त्याला कोण काय करणार? आजचा अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. यानंतर पुढे विधानसभा निवडणुकांना सामोरे जायचे आहे. पण, जे आमदार फुटले आहेत; त्यांची नावे आज रात्री किंवा उद्या बाहेर पडणारच आहेत. त्यामुळे आपला आमदार पैसे घेऊन फुटला आणि पक्षाशी गद्दारी केली, हे पुन्हा एकदा जाहीर होईल, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

या गद्दारीविरोधात प्रचंड संताप जनतेच्या मनात आहे. गद्दारी करणाऱ्यांविरुद्ध तसेच गद्दारी करायला लावणार्‍यांविरोधातही जनतेच्या मनात रोष आहे. पाच कोटी रूपये आणि १०० कोटींची विकासकामे हा दर ठरला होता. तुम्ही हे देऊन आमदारांना विकत घेऊ शकता; पण, जनतेला घेऊ शकत नाहीत. तुम्ही आमदारांना विकत घेताना खूप पैसे वाटले आहेत. आमदारांना विकत घेताना खूप, अगदी हजार कोटी रूपयांचा विकासनिधी दिलात. पण, तुम्हाला कुठेच यश मिळू शकला नाही. म्हणून तुम्ही १७ वरच अडकले. तेव्हा जनतेला विकत घेऊ शकतो, या भ्रमात राहून आम्ही विधानपरिषद जिंकली आता विधानसभा जिंकू , हे विसरून जा. जनतेच्या मनात तुमच्याबद्दल प्रचंड राग आहे. आजनंतर अधिक राग निर्माण होईल की अजून तुमच्या घाणेरड्या सवयी गेलेल्या नाहीत, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.