Maharashtra Kesari Kusti : कुस्ती क्षेत्रातील लोकांकडूनच पैलवानांवर (Wrestler) अन्याय सुरू आहे आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील (Maharashtra Kesari Kusti) पैलवानांवर अन्याय होतोय, असा आरोप डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील (Double Maharashtra kesari Chandrahar Patil) याने केला आहे. तसंच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये होत असलेले वाद (Controversy) हे कायमस्वरूपी टाळण्यासाठी सांगलीमध्ये यंदाची 'महाराष्ट्र केसरी कुस्ती' स्पर्धा भरवण्याचा आपला मानस असल्याचं चंद्रहार पाटील यांनी म्हटलं आहे. तसंच या स्पर्धेसाठी एक कोटींचं बक्षीस देण्याची आपली तयारी असल्याचं पैलवान चंद्रहार पाटील याने जाहीर केला आहे.
'मी आत्महत्येच्या विचारात होतो'
महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा सांगलीत झाल्या ,तर त्या विना तक्रार आणि वादा-विना होऊ शकतात, इतकंच नाही तर कुस्ती स्पर्धा यशस्वी करून दाखवून देऊ असं सांगत चंद्रहार पाटील यांनी कुस्तीचा सांगली पॅटर्न महाराष्ट्रात सुरू होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. पैलवानांवर अन्याय झाल्यास तो आत्महत्येच्या (Suicide) निर्णयापर्यंत पोहोचतो. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत माझ्यावरही अन्याय झाला होता, त्यावेळी मीसुद्धा आत्महत्या करण्याच्या विचारात होतो, असा गौप्यस्फोटही चंद्रहार पाटील याने केला. पण आपण त्यातून सावरलो, असं त्यांनी सांगितलं.
'पैलवानांवर अन्याय करु नका'
ज्या चार जणांनी आपल्यावर अन्याय केला, त्यांना माझी विनंती आहे की इतर कोणत्याही पैलवानावर असा अन्याय करु नका, असंही चंद्रहार पाटील याने म्हटलं आहे. सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत चंद्रहार पाटील बोलत होता.
'2009 मध्ये झाला अन्याय'
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत आपल्यावर दोनवेळा अन्याय करण्यात आल्याचं चंद्रहार पाटील याने म्हटलंय. 2003मध्ये यवतमाळ इथं झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत कुस्ती झाल्याच्या दुसऱ्या दिवशी निकाल देण्यात आला. हा निकाल प्रतिस्पर्धी मल्लाच्या बाजूने दिला. त्यानंतर 2009 मध्ये याच स्पर्धेत केवळ मला पराभूत करण्यासाठी सहा मिनिटांची कुस्ती तब्बल दीड तास खेळवण्यात आली. मी डाव टाकला असतानाही विरोधी मल्लास गुण देण्यात आला. मी तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीची गदा जिंकू नये यासाठी ही खेळी करण्यात आल्याचं चंद्रहार पाटलीने सांगितलं.