Maharashtra HSC Paper Leak 2023: महाराष्ट्रातील मध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या 12 वीच्या परीक्षेसंदर्भातील धक्कादायक माहिती समोर आली आहे. गणिताचा पेपर फुटल्याच्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या टीमला 12 वीचा फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपरही फुटल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस तपासादरम्यान हा खुलासा झाला आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सुत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून अन्य दोन पेपर फुटल्याचे पुरावे पोलिसांना सापडल्याचं सांगितलं जात आहे.
गणिताबरोबरच फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपरही फुटल्याचं तपासात समोर आलं आहे. यासंदर्भातील पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. हे पुरावे अन्य दोन पेपर फुटल्याचं सिद्ध करण्यासाठी पुरेसे आहेत असं सांगितलं जात आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 3 मार्च रोजी व्हॉट्सअपवरुन गणिताचा पेपर फुटल्याचं स्पष्ट झालं. मात्र त्यापूर्वी 27 फेब्रुवारी रोजी फिजिक्स आणि 1 मार्च रोजी झालेला केमिस्ट्रीचा पेररही फुटला होता. गुन्हे शाखेच्या तपासामध्ये सापडलेले पुरावे या पेपरफुटीसंदर्भातील असल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे. गणिताचा पेपर सुरु होण्याच्या अर्धा तास आधी तो व्हॉट्सअपवरुन व्हायरल करण्यात आल्याची माहिती समोर आली होती.
गुन्हे शाखेच्या एका मोठ्या अधिकाऱ्याने महाराष्ट्रातील अहमदनगरमधील मातोश्री भागुबाई भांबरे अॅग्रीकल्चरल अॅण्ड सायन्स ज्युनियर कॉलेजमधून अटक करण्यात आलेल्या एका कर्मचाऱ्याबरोबरच शिक्षकांकडून मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. त्यांच्या व्हॉट्सअपवरील डेटा रिकव्हर करण्यात आला असता गणिताच्या आधी फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपरही फुटला होता.
गुन्हे शाखेने यापूर्वीच्या तपासामध्ये अहमदनगरमधील या कॉलेजच्या 337 विद्यार्थ्यांपैकी 119 विद्यार्थ्यांना फुटलेला गणिताचा पेपर वेळेआधीच मिळाला होता. परिक्षा केंद्रावरच विद्यार्थ्यांना हा पेपर मिळाला. पैशांच्या मोबदल्यात पेपर फोडला होता. आता या प्रकरणाचा सखोल तपास सुरु असून कॉलेजच्या संस्थापक आणि मालकांचा शोध पोलीस घेत आहेत.