पुढील ५- ६ दिवसात सरकार स्थापन होईल- संजय राऊत

पुढील ५- ६ दिवसात सरकार स्थापन होईल असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

Updated: Nov 20, 2019, 10:38 AM IST
पुढील ५- ६ दिवसात सरकार स्थापन होईल- संजय राऊत  title=

मुंबई : पुढील ५- ६ दिवसात सरकार स्थापन होईल असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. राज्यपालांकडे बहुमताचा आकडा घेऊन गेल्यावर राज्यपाल सरकार स्थापनेचं निमंत्रण देतील आणि डिसेंबरपूर्वी मजबूत सरकार बनेल असेही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पवार साहेब भेटणार असल्याची माहिती राऊत यांनी दिली. आजची काँग्रेस आणि राष्ट्रवादीची शेवटची बैठक असेल. त्यानंतर बैठका होणार नसल्याचे ते म्हणाले. 

शिवसेना एनडीएतून बाहेर असून त्यांना विरोधी बाकांवर जागा दिल्याचे एनडीएनकडून स्पष्ट करण्यात आले. या पार्श्वभुमीवर शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'तू टीका करण्यात आली. संजय राऊत अद्यापही राज्यसभेत आपल्या खुर्चीवर बसले नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. खुर्ची बदलल्यामुळे संजय राऊत राज्यसभेत गेले नाहीत आणि राज्यसभेत जाणारही नाहीत अशी माहितीही समोर येत आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट होणार आहे. दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास ही भेट होणार आहे. महाराष्ट्रातील ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी पवार मोदींना भेटणार आहेत. या बैठकीला शिवसेनेचे खासदारही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचं कौतुक केलं होतं. मात्र यात कोणताही राजकीय ट्वीस्ट असल्याची शक्यता संजय राऊत यांनी फेटाळली.

अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद

आघाडीची बैठक होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची दुपारी दिल्लीत बैठक होणार आहे. मुख्यमंत्रीपद अडीच वर्षासाठी मिळावे ही राष्ट्रवादीची भूमिका  कायम आहे. पहिले अडीच वर्ष शिवसेनेला मुख्यमंत्रीपद आणि नंतरची अडीच वर्ष राष्ट्रवादीला मिळावे अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. शिवसेनेचे 56 तर राष्ट्रवादीचे 54 आमदार आहेत, यात फारसा फरक नसल्यानेच राष्ट्रवादीचा मुख्यमंत्रीपदावर दावा आहे. राष्ट्रवादीच्या आज दुपारच्या बैठकीत यावर पुन्हा चर्चा होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी काँग्रेसबरोबरच्या बैठकीतही यावर चर्चा होईल.