मुंबई : उद्या शिवाजी पार्क येथे महाविकास आघाडीच्या आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे यावेळी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. पण आता उपमुख्यमंत्री कोण होणार ? याबद्दल खलबतं रंगली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेसकडे उपमुख्यमंत्रीपद जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांची नावे उपमुख्यमंत्री पदासाठी समोर आली आहेत. पण राजकीय घडामोडी वेगाने वळण घेत असून आता अजित पवार हेच उपमुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जात आहेत.
अजित पवार उपमुख्यमंत्रीपद घेण्याची शक्यता असून त्यांच्याकडे गृहखातं देण्यात येईल अशी चर्चा आहे. तर जयंत पाटील यांच्याकडे अर्थ खातं सोपवलं जाण्याची शक्यता आहे.
अजित पवार आमच्यात राहिले असते तर पक्षच्या वाट्याला येणारं सर्वोच्च मंत्रिपद त्यांना देणार होतो अशी प्रतिक्रिया काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी दिली होती. पण आता अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद गेल्यास जयंत पाटील यांना त्यांच्या नेतृत्वात काम करावे लागणार आहे. उपमुख्यमंत्रीपद अजित पवार यांनी स्वीकारावं असा आग्रह त्यांना राष्ट्रवादीच्या आमदारांकडून होत आहे. अजित पवारांनी पक्षातून बंड केल्यानंतर जयंत पाटील यांनी विधिमंडळ गटनेतेपद स्वीकारले होते. त्यामुळे जयंत पाटील हे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार अशी शक्यता होती. पण आता शरद पवार हे काय निर्णय घेतात ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अजित पवार यांच्याकडे व्हीपचा अधिकार असल्याचे वृत्त जाणिवपूर्वक पसरविण्यात आले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. अजित पवार हे गटनेते असल्याचे पत्र अजित पवारांनी राजभवनात दिलं होत पण ते विधानभवनात दिलं नव्हत. त्यानंतर जयंत पाटील यांच्या नावाचे पत्र राष्ट्रवादीने विधीमंडळात दिले. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार नि:शंक झाले. व्हीपचा अधिकार जर जयंत पाटील यांच्याकडेच राहीले हे स्पष्ट झाल्यावर मग अजित पवारांकडे कोणते अधिकार राहीले असा प्रश्न उपस्थित झाला. दरम्यान खुले मतदान होईल असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्यावर सर्वच बाबी उघड झाल्या. व्हीपचा अधिकार जयंत पाटील यांना मिळणार असल्याचे स्पष्ट झाले. हा व्हीप राष्ट्रवादीच्या आमदारांना बंधनकारक असणार होता.