'दु:खी' चंद्रकांतदादा विठ्ठलाला साकडं घालण्यासाठी पंढरपुरात

'कोणत्याही पक्षाचे आमदार फोडणे ही आमची संस्कृती नाही. जे आमच्यासोबत आले ते विकासासाठी आले'

Updated: Nov 7, 2019, 08:31 PM IST
'दु:खी' चंद्रकांतदादा विठ्ठलाला साकडं घालण्यासाठी पंढरपुरात  title=

सचिन कसबे, झी २४ तास, पंढरपूर : मावळते महसूल मंत्री आणि भाजपा नेते यांना पंढरपूरच्या विठ्ठलाची महापूजा करण्यास होणारा विरोध मावळल्यानंतर ते गुरुवारी सायंकाळी पंढरपुरात दाखल झाले. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी 'जनतेनं आम्हाला जनादेश देऊनही सरकार स्थापन होण्यास उशीर होतोय, याचं दुःख असल्याचं' म्हटलंय. सत्तास्थापनेसाठी होणाऱ्या विलंबामुळे ज्या पद्धतीने भाजपा नेत्यांवर होत असलेल्या टीकेमुळेही आपण दु:खी असल्याचं चंद्रकांत दादा पाटील यांनी यावेळी म्हटलं. 

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १५ दिवस लोटले तरी सत्तासंघर्ष कायम आहे. सत्तास्थापनेचा कोणताच पर्याय पुढे येत नसल्यानं आता आमदारांची फोडाफोडी होण्याची भीती काही पक्षांना वाटू लागलीय. त्यामुळे आमदार सुरक्षित ठेवण्यापासून ते, जर आमदार फुटले तर निवडणुकीत त्यांना सर्वपक्षीय विरोध करण्यापर्यंत नवे डावपेच आतापासूनच लढवले जात आहेत. परंतु, याबद्दल बोलताना मात्र कोणत्याही पक्षाचे आमदार फोडणे ही आमची संस्कृती नाही. जे आमच्यासोबत आले ते विकासासाठी आले, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. निसर्गाचे बदललेलं चक्र पूर्ववत होऊ दे, असं साकडंही आपण विठ्ठलाकडे घातल्याचं त्यांनी म्हटलंय. 

 

दरम्यान, निकालानंतर आजचा १५ वा दिवसही वेगवान राजकीय घडामोडींचा पण अनिर्णितच राहिला. आजच्या घडामोडींची केंद्र होती मातोश्री, वर्षा बंगला आणि राजभवन... मातोश्रीवर शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत सर्व आमदारांनी पक्षप्रमुखांच्या भूमिकेचं जोरदार समर्थन केलं. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाची मागणी ही एकट्या संजय राऊतांची नाही, तर तमाम शिवसैनिकांची आहे यावर शिक्कामोर्तब झालं... शिवसेनेमध्ये हे घडत असताना भाजपाचे मंत्री राज्यपालांना भेटून आले. मात्र भाजपानं सत्तास्थापनेचा दावा केलाच नाही. भाजपाची कालचीच भूमिका आजही कायम राहिली. त्याच वेळी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भाजपा नेत्यांच्या बैठकांचं सत्रही सुरू राहिलंय... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र आज वर्षा बंगल्यावरूनच सूत्र हलवत होते.