Share Market: 524 चा शेअर 1392 ला! 'या' कंपनीला मिळालं सरकारी काम; सचिननेही गुंतवलेत 4.99 कोटी

Share Market Updates: या कंपनीने आर्थिक वर्षामध्ये 93 कोटींची कमाई केली आहे. म्हणजेच कंपनीच्या कमाईत 9.30 टक्क्यांनी वाढ झाली आहे.  याचाच दुसरा अर्थ कंपनीचा निव्वळ नफा 15 कोटींचा आहे. 

स्वप्निल घंगाळे | Updated: May 26, 2024, 08:45 AM IST
Share Market: 524 चा शेअर 1392 ला! 'या' कंपनीला मिळालं सरकारी काम; सचिननेही गुंतवलेत 4.99 कोटी title=
या कंपनीची कामगिरी सातत्यपूर्ण आहे (प्रातिनिधिक फोटो)

Share Market Updates: आझाद इंजिनिअरिंग लिमिटेड ही कंपनी सध्या चर्चेत आहे. ही कंपनी हवाई उड्डाण क्षेत्रातील म्हणजेच एरोस्पेससंदर्भातील सुटे भाग तसेच टर्बाइन्सचं उत्पादन घेते. या कंपनीच्या उत्पादनांना एरोस्पेस, संरक्षण, ऊर्जा तसेच तेल-वायू उद्योगांमधील उत्पादकांकडून चांगली मागणी आहे. असं असतानाच सध्या कंपनी चर्चेत असण्यामागील कारण म्हणजे त्यांना केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या संरक्षण मंत्रालयाच्या एका महत्त्वाच्या विभागाकडून मोठी ऑर्डर मिळाली आहे. याची माहिती कंपनीनेच जाहीर केली आहे.

कंपनी नेमकं काय करणार?

आझाद इंजिनिअरिंगने अलीकडेच जीटीआरई (गॅस टर्बाइन रिसर्च एस्टॅब्लिशमेंट) तसेच भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाअंतर्गत संशोधन आणि विकास संस्थांपैकी एक असलेल्या 'संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे'बरोबर (डीआरडीओ) महत्त्वाचा करार केला आहे. या करारानुसार कंपनी डीआरडीओसाठी संपूर्ण असेंबल्ड ॲडव्हान्स टर्बो गॅस जनरेटर इंजिनचे उत्पादन करणार आहे. तसेच या इंजिनची असेंब्ली आणि एकत्रीकरण करण्याचं कंत्राटही कंपनीला मिळाले आहे. हे इंजिन भारतीय संरक्षण दलाच्या दृष्टीकोनातून फार महत्त्वाचं आहे. संरक्षणासंदर्भातील विविध प्रयोगांमध्ये त्याचा वापर केला जाणार आहे. या कराराच्या माध्यमातून आझाद इंजिनिअरिंग प्रोपल्शन सिस्टीमच्या क्षेत्रात पाऊल ठेवणार आहे. जीटीआरईसाठी आझाद इंजिनिअरिंग सिंगल-सोर्स इंडस्ट्री पार्टनर (आयपी) ठरणार आहे. सदर कराराअंतर्गत आझाद इंजिनिअरिंग पूर्णपणे असेंबल केलेल्या टर्बो इंजिनांची पहिली खेप 2026 च्या सुरुवातीला वितरित करण्यास सुरुवात करेल.

कंपनी विस्ताराची मोठी संधी

आझाद इंजिनिअरिंग ऊर्जा निर्मिती, एरोस्पेस आणि संरक्षण आणि तेल आणि वायू क्षेत्रांसाठी उत्पादन घेण्याबरोबरच असेंबलीचं काम करते. त्यांनी या क्षेत्रात आपली एक नवीन ओळख निर्माण केली आहे. आझाद इंजिनिअरिंग अत्याधुनिक टर्बो इंजिनसाठी एंड-टू-एंड मॅन्युफॅक्चरिंग ऑफर करते. तसेच या इंजिनचं असेंबलिंगचं कामही कंपनीच करते. राष्ट्रीय आणि जागतिक संरक्षण आवश्यकतांसाठी पूर्ण प्रोपल्शन सिस्टमच्या माध्यमातून या कंपनीला विस्ताराची बरीच संधी दिसून येत आहे.

166 टक्के परतावा

गुरुवारी या कंपनीच्या प्रत्येक शेअरची किंमत 1392 रुपये होती. या कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन 8229 कोटी रुपये इतकं आहे. या कंपनीचा आयपीएल प्रत्येक शेअरसाठी 524 रुपयांनी बाजारात आलेला. कंपनीने गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर रिटर्न्स दिले असून परताव्याची टक्केवारी तब्बल 166 टक्के इतकी आहे.

93 कोटींची कमाई

तिमाहीची आकडेवारी पाहिल्यास आर्थिक वर्ष 2024 मध्ये कंपनीने 93 कोटींची कमाई केली आहे. म्हणजेच कंपनीच्या कमाईत 9.30 टक्क्यांनी वाढ झाली आहे.  याचाच दुसरा अर्थ कंपनीचा निव्वळ नफा 15 कोटींचा आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये कंपनीने 341 कोटी रुपयांचा महसूल आणि 59 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमवला मागील आर्थिक वर्षाच्या 8 कोटी रुपयांच्या निव्वळ नफ्याच्या तुलनेत हा अनेक पटींनी अधिक आहे.

सचिन तेंडुलकरनेही केलीय गुंतवणूक

भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने मार्च 2023 मध्ये आयपीओ पूर्व फेरीमध्ये आझाद इंजिनिअरिंगचे शेअर्स खरेदी केले होते. 114.10 रुपयांच्या सरासरी किंमतीला सचिनने कंपनीमधील 4 लाख 38 हजार 120 शेअर्स खरेदी केलेले. म्हणजेच सचिनने हे शेअर्स 4.99 कोटी रुपयांना विकत घेतलेले.

(Disclaimer: येथे देण्यात आलेली माहिती स्टॉक्स ब्रोकरेजकडील आकडेवारीनुसार देण्यात आली आहे. तुम्ही अशाप्रकारे कोणत्याही पद्धतीची गुंतवणूक करु इच्छित असाल तर सर्वात आधी सर्टिफाइड गुंतवणुकदार सल्लागारांचा सल्ला घ्यावा. तुम्हाला कोणताही नफा किंवा तोटा झाल्यास झी 24 तास यासाठी जबाबदार राहणार नाही.)