मुंबई : Eknath Shinde government cabinet expansion : शिंदे - फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज पार पडला. शिंदे फडणवीस सरकारच्या 18 मंत्र्यांनी आज मंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. शिंदे गटाचे 9 आणि भाजपच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. आजच्या विस्तारात सर्व कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली. यापुढे होणा-या विस्तारात राज्यमंत्र्यांची घोषणा होणार आहे. या मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान देण्यात आलेली नाही. यावरुन विरोधकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात 18 मंत्री सहभागी झाले आहेत. भाजप आणि शिंदे गटातील प्रत्येकी 9 मंत्र्यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपकडून आज राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजय कुमार गावित, गिरीश महाजन, सुरेश खाडे, रवींद्र चव्हाण, अतुल सावे, मंगलप्रभात लोढा यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. तर शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, संदीपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई यांनी आज कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. यापैकी मंगलप्रभात लोढा, सुरेश खाडे यांची प्रथमच मंत्रीपदी वर्णी लागलीय.
शिंदे गटाकडून दादाजी भुसे, दीपक केसरकर, गुलाबराव पाटील, उदय सामंत, तानाजी सावंत, संदीपान भुमरे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. तर संजय राठोड यांनाही संधी देण्यात आली आहे. तर वादात अडकूनही अब्दुल सत्तार यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, संजय राठोडांच्या समावेशावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मंत्रीपद देणं दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तर संजय राठोड यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. क्लीन चिट दिल्यामुळेच समावेश, करण्यात आल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
महाविकासआघाडी सरकारमध्ये मंत्री असलेल्या बच्चू कडू आणि यड्रावकर यांना संधी देण्यात आलेली नाही. बच्चू कडू यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. कुठल्याही मंत्रिपदापेक्षा बच्चू कडू मोठा असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तर आमदार संजय शिरसाट यांचा पत्ता कट करत मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. मात्र नाराज नसल्याची शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्यभरात भाजप आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी अतुल सावेंना मंत्रिपद मिळाल्याबाबत जल्लोष साजरा करण्यात आला. मुंबईत गुलाबराव पाटलांच्या समर्थकांनी ढोल वाजवत जल्लोष केला. तर बीडमध्ये सुधीर मुनगंटीवारांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली.