ST Bus : 'या' प्रवाशांना एसटी प्रवासात सरसकट 50 टक्के सूट, राज्य सरकारची मोठी घोषणा

Maharashtra Budget 2023: शिंदे-फडणवीस सरकार यांच्याकडून राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या असून एसटी प्रवासातही सरसकट 50 टक्के सूट देण्याची घोषणा केली. 

Updated: Mar 9, 2023, 04:11 PM IST
ST Bus : 'या' प्रवाशांना एसटी प्रवासात सरसकट 50 टक्के सूट, राज्य सरकारची मोठी घोषणा title=

Maharashtra Budget 2023: राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात महिलांसाठीही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजनेची घोषणा केली. त्यानंतर राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत तिकिटदरात महिलांना 50 टक्के सवलत देण्यात येणार असल्याची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे महिलांना आता अवघ्या निम्म्या दरांत प्रवास करता येणार आहे. ही योजना ग्रामीण भागातील महिलांसाठी जास्त फायदेशीर ठरणार आहे. याआधी राज्यात 75 वर्षावरील नागरिकांना एसटीचा प्रवास मोफत करण्यात आला आहे. 

तसेच मुलींच्या सक्षमीकरणाकरता लेक लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात येईल. पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटूंबातील मुलींच्या जन्मानंतर मुलीला 5000 रुपये देण्यात येणार आहे. याचदरम्यान  महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण राबवण्यात येणार असून राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेतील तिकिटदरात महिलांना आता 50 टक्के सरसकट सवलत दिली जाणार आहे. तसेच एसटी महामंडळात 5 हजार ई बॅटरी बस आणणार आहेत. 

 ‘लेक लाडकी’ योजना नव्या स्वरूपात

  • मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना आता नव्या स्वरूपात
  • पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना लाभ
  • जन्मानंतर मुलीला 5000 रुपये
  • पहिलीत 4000 रुपये, सहावीत 6000 रुपये
  • अकरावीत 8000 रुपये
  • मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रुपये  

महिलांना एसटी प्रवासात सरसकट 50 टक्के सुट

  • राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत तिकिटदरात महिलांना 50 टक्के सवलत 
  • चौथे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार 
  • महिला बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात बांबू क्लस्टर 
  • कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापुरी चप्पल क्लस्टर 
  • मुंबईत महिला युनिटी मॉलची स्थापना 
  • महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण 
  • माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात 4 कोटी महिला-मुलींची आरोग्य तपासणी, औषधोपचार