'चाटूगिरी करणारे..', ED चा उल्लेख करत राऊतांचा राज यांना टोला! म्हणाले, 'ते ठाकरे असतील तर मी..'

Maharashtra Assembly Election Sanjay Raut React On Raj Thackeray: राज ठाकरेंनी संजय राऊत राहत असलेल्या मतदारसंघातील जाहीर सभेमध्ये 'भिकार संपादक' असा उल्लेख करत केलेल्या टीकेवर राऊतांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 9, 2024, 10:16 AM IST
'चाटूगिरी करणारे..', ED चा उल्लेख करत राऊतांचा राज यांना टोला! म्हणाले, 'ते ठाकरे असतील तर मी..' title=
राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

Maharashtra Assembly Election Sanjay Raut React On Raj Thackeray: 'भिकार संपादक' असा उल्लेख करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर विक्रोळीमधील जाहीर सभेतून टीका केल्यानंतर यावर आता राऊतांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवताना आपल्या खास शैलीत राज यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे. संजय राऊत यांनी राज ठाकरेंचं बोलणं हे भारतीय जनता पार्टी आणि फडणवीसांचा स्क्रीप्ट असल्याचा टोला लगावला आहे. इतक्यावरच न थांबता राज ठाकरेंच्या डोक्यावर ईडीची टांगती तलवार असल्याचा उल्लेखही राऊतांनी केला आहे.

राज काय म्हणालेले?

भांडूपमध्ये राहणाऱ्या राऊत यांचा थेट उल्लेख न करता शुक्रवारच्या सभेतून राज ठाकरेंनी त्यांना टोला लगावला. "अख्खी भाषा घाणेरडी करुन टाकणारा एक 'भिकार संपादक' इकडे राहतो. त्याला वाटतं तोंड त्यालाच दिलंय. इथे आम्ही ठाकरे आहोत. आमचा जेनेटीक प्रॉब्लेम आहे. त्यांना वाटतं शिव्या त्यांच्याकडे आहे. ते शोले म्हणजे होतं ना तुम दो मारो हम चार मारेंगे! कसलाही मागचा पुढचा विचार नाही. सकाळी उठायचं आणि वाटेल ते बडबडत बसायचं आणि बोलत बसायचं. याला वाटतं आमच्याकडे तोंड नाहीयेत. आमचं जर तोंड सुटलं ना... त्यांना कल्पना आहे या गोष्टींची. संयम बाळगतो याचा अर्थ XX समजू नये यांनी," असं म्हणत राज यांनी थेट उल्लेख न करता राऊतांना विक्रोळीच्या सभेतून आव्हान दिलं. 

राऊत म्हणाले, 'भाजपाच्या नादाला लागणारा माणूस...'

पत्रकारांनी यावरुनच राऊत यांना प्रश्न विचारला असता त्यांनी, "राज ठाकरे बोलत आहेत? बोलू द्या ना! भारतीय जनता पार्टीच्या नादाला लागणारा माणूस दुसरं काय बोलू शकतो?" असा प्रतिप्रश्न केला. तसेच पुढे बोलताना, "जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत असं आम्ही म्हणतो, जे महाराष्ट्राची लूट करत आहेत त्यांच्याविरुद्ध लढण्यासाठी भाषा हे सुद्धा एक हत्या आहे. ज्या शत्रूला जी भाषा समजते त्या भाषेचा वापर करावा असं आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं आहे. भाषेचा शुद्ध, आणि तुपातली भाषा कोणासाठी वापरायची महाराष्ट्राच्या शत्रूसाठी?" असा सवालही राऊतांनी उपस्थित केला.

नक्की वाचा >> '...तर शरद पवार तुमच्या नोटिशीला काय घाबरणार?' पुण्यातील 'त्या' आमदाराला सुप्रिया सुळेंचा सवाल

ते ठाकरे असतील तर मी...

"आम्ही चाटूगिरी आणि चमचेगिरी करणारे लोक नाही आहोत. राज ठाकरे इथे येऊन काय बोलले त्यात मला जायचं नाही. निवडणुका आहेत. भाजपाचं स्क्रीप्ट असेल. फडणवीसांचं स्क्रीप्ट आहे. बोलावं लागतं. ईडीची तलावर आहे वर! ईडी आहे ना वर बसलेलं. आम्ही अत्यंत सभ्य आणि सुसंस्कृत माणसं आहोत. आम्ही एका परंपरेत राजकारण केलेलं आहे. माझं बरंचसं आयुष्य बाळासाहेबांबरोबर गेलेलं आहे हे राज ठाकरेंसहीत सर्वांना माहिती आहे. त्यामुळे कोणती भाषा कधी वापरायची, काय लिहायचं आणि काय बोलायचं याची मला धडे घेण्याची आवश्यकता नाही. ते ठाकरे असतील तर मी राऊत आहे आणि बाळासाहेबांनी घडवलेला राऊत आहे. खरं म्हणजे आज महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघांमध्ये गुंडांचं राज्य निर्माण झालेलं आहे त्यावर राज ठाकरेंनी बोलावं. राज ठाकरे ज्या भागात भाषण करुन गेले तिथे अंडरवर्ल्डच्या मदतीने निवडणुका लढवल्या जात आहेत शिंदे आणि भाजपाकडून," असं संजय राऊत म्हणाले.