Raj Thackeray Amaravati Rally Speech: अमरावती मतदारसंघातील विधानसभेचे उमेदवार पप्पू उर्फ मंगेश पाटील यांच्या प्रचारार्थ बुधवारी अमरावतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली. या सभेमध्ये त्यांनी मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्यांबरोबरच हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात घातल्याचं पाहायला मिळालं. महाविकास आघाडीवर राज ठाकरेंनी गंभीर आरोप करताना मशिदीतून फतवा काढून महाविकास आघाडीतील घटक पक्षांना मतदान करायला सांगितलं जात असल्याचा दावा राज ठाकरेंनी केला आहे.
"आपण मराठी म्हणून किंवा हिंदू म्हणून कधी विचार करणार आहोत का नाही ? हिंदू फक्त दंगलीत एकत्र असतो बाकीच्या वेळेस तो हिंदू नसतो. आणि हेच बाहेरच्यांना हवं आहे. मी एक क्लिप पाहिली आज, एक मुसलमान मौलवी मशिदीतून फतवा काढतो की काँग्रेसला, राष्ट्रवादी काँग्रेसला आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाला एक गठ्ठा मतदान करा असे फतवे निघत आहेत. लोकसभेला पण हेच घडलं. मग हिंदू का विखुरलेले?" असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला. तसेच पुढे बोलताना, "या धर्मांध मुसलमानांच्या धांगडधिंग्याच्या विरोधात आवाज उठवणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. मशिदींवरच्या भोंग्यांच्या विरोधात मी आवाज दिला आणि ते बंद करून घेतले. हे केलं म्हणून माझ्या महाराष्ट्र सैनिकांवर 17 हजार केसेस टाकल्या, आणि त्यावेळेस सरकार कोणाचं होतं तर उद्धव ठाकरे-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच," असंही राज ठाकरे म्हणाले.
"माहीममध्ये एक मझार होती ती अनधिकृत होती, ती आम्ही पाडायला लावली. माझा आज तुम्हाला शब्द देतो, माझ्या हाती सत्ता द्या, एकाही मशिदीवर भोंगा लावू देणार नाही," असं राज यांनी भाषणात म्हटलं आहे. "इम्तियाज जलीलने हजारो मुसलमानांचा मोर्चा मुंबईत आणला, ही हिंमत का झाली? कारण काँग्रेस-शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस- उद्धव ठाकरेंचे खासदार निवडून आलेत," असा टोलाही राज यांनी लगावला. "उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर अभद्र युती केल्यावर स्वर्गीय बाळासाहेबांच्या नावाच्या मागची 'हिंदुहृदय' सम्राट ही उपाधी काढली," असंही राज म्हणाले.
नक्की वाचा >> 'बोलणारा आणि हसणारे दोघेही...', सदाभाऊ खोतांचा वादग्रस्त Video शेअर करत अजित पवारांच्या NCP चा इशारा
"नवनीत राणांचा पराभव झाल्यावर मुसलमानांनी रस्त्यावर उतरून बीभत्स आंनद व्यक्त केला. मागे एकदा अमरावतीत दंगल झाली तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना, विश्व हिंदू परिषद यांनी दंगेखोर मुसलमानांना सडकून काढलं होतं. कितीवेळ बाहेर उभं राहून करायचं, माझ्या हाती सत्ता द्या, एकेकाला चांगला सडकून काढायचा," असं राज भाषणात म्हणाले. "2024 ची निवडणूक महत्वाची आहे. तुमच्या मतांशी ज्यांनी ज्यांनी प्रतारणा केली त्यांना धडा शिकवण्याची ही निवडणूक आहे. मला या महाराष्ट्रासाठी काहीतरी करून दाखवायचं आहे. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवावा अशी माझी इच्छा आहे. म्हणून येत्या 20 नोव्हेंबरला माझ्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या," असं राज भाषणाच्या शेवटी म्हणाले.