Ajit Pawar on Sadabhau Khot: सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी शरद पवारांवर आक्षेपार्ह टीका केली आहे. महाराष्ट्राचा चेहरा तुझ्यासारखा करायचा आहे का ? असा एकेरी उल्लेख करत त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. त्याच आता अजित पवारांनी (Ajit Pawar) यावर भाष्य करत नाराजी जाहीर केली आहे. अजित पवारांनी एक्सवर पोस्ट शेअर करत आपला संताप व्यक्त केला आहे. यापुढे पवार साहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन कोणी वैयक्तिक टीका केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही अशा शब्दांत त्यांनी इशारा दिला आहे.
'ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेब यांच्या विषयी सदाभाऊ खोत यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत चुकीचे व निंदनीय आहे. अशा पद्धतीने खालच्या पातळीवर पवार साहेबांवर वैयक्तिक टीका करणे आम्हास पूर्णपणे अमान्य आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व वैयक्तिकरित्या मी या विधानाचा तीव्र शब्दात निषेध करतो. यापुढे पवार साहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन कोणी वैयक्तिक टीका केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही," अशी पोस्ट अजित पवारांनी शेअर केली आहे.
“अरे पवार साहेब, तुमच्या चिल्यापिल्याने कारखाने हाणले, बँका हाणल्या, सुतगिरण्या हाणल्या, पण पवारांना मानावं लागेल, एवढं घडलं तरी सुद्धा भाषणात म्हणतं, मला महाराष्ट्र बदलायचा आहे, मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. कसला तुझा चेहरा? तुझ्या चेहऱ्यासारखा पाहिजे का? तुला कसला चेहरा पाहिजे?”, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे. सांगलीमधील जत येथे आयोजित सभेत ते बोलत होते.
राज्याची तिजोरी ही गाय आहे. ती गाय शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला पाहिजे असंही सदाभाऊ खोत म्हणाले. "शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवाले यांनी देवेंद्र फडणवीस यांना का घेरलं आहे माहिती आहे का? तर ते काय म्हणत होते साहेबाला, गायीची जी कास आहे त्या कासेला चार थानं असतात. या अर्धं थान वासराला पाजायचं म्हणजे आपल्याला, आणि साडेतीन थानातलं दूध आपणच हाणायचं. देवेंद्र फडणवीसांनी मी सगळं दूध वासरालाच देणार असं सांगितलं. मग शरद पवार साहेबांना नऊवा महिना लागला आणि कळा सुटल्या”, अशी खोचक टीका सदाभाऊ खोत यांनी केली.