मराठवाड्यात जरांगे फॅक्टर? लोकसभेप्रमाणे विधानसभेतही फटका बसणार? Exit Poll ने वर्तवला अंदाज

मराठा फॅक्टरमुळे लोकसभेला मोठा फटकाही बसला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही जरांगे फॅक्टरची जादू दिसेल का?   

शिवराज यादव | Updated: Nov 21, 2024, 06:32 PM IST
मराठवाड्यात जरांगे फॅक्टर? लोकसभेप्रमाणे विधानसभेतही फटका बसणार? Exit Poll ने वर्तवला अंदाज title=

यंदाची विधानसभा निवडणूक मराठा आंदोलनाभोवती केंद्रित राहिली. मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्याचा परिणाम महायुतीला लोकसभा निवडणुकीत दिसला. मराठा फॅक्टरमुळे लोकसभेला मोठा फटकाही बसला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही जरांगे फॅक्टरची जादू दिसेल का? पाहूयात.

लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरमुळे महायुतीला मराठवाड्यात मोठा फटका बसला होता. संपूर्ण मराठवाड्यातून महायुतीला फक्त एक जागा मिळाली होती. लोकसभा निवडणुकीप्रमाणंच विधानसभा निवडणुकीतही पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार का ? मराठ्यांनी कुणाला कौल दिला याबाबत एक्झिट पोलनी अंदाज जाहीर केलेत

 झी 24 तासच्या झिनियाच्या AI एक्झिट पोलच्या अंदाजानुसार पुन्हा एकदा जरांगे फॅक्टर चालू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. जरांगे फॅक्टरमुळे महाविकास आघाडीला फायदा होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय

मराठवाड्यातील 46 जागांपैकी महाविकास आघाडीला 24 ते 29 जागा मिळण्याची शक्यता आहे तर महायुतीला 16 ते 21 जागा मिळण्याची शक्यता आहे तर दोन अपक्षही निवडणूक जिंकून येण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यात जरांगे फॅक्टरचा परिणाम जाणवणार का?याबाबत मनोज जरांगे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलीय. मराठ्यांच्या मतांशिवाय कुणीही निवडून येऊ शकत नाही. त्यामुळे निवडून आलेल्या उमेदवाराला मराठ्यांच्या समस्या सोडवाव्या लागतील. निवडून आलेल्या उमेदवाराने दगाफटका केल्यास राज्यात फिरणं मुश्किल होईल,असा इशारा जरांगे यांनी दिलाय.

विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याची घोषणा करणा-या मनोज जरांगे यांनी ऐनवेळी माघार घेतली. तसेच मराठा आरक्षणाला विरोध करणा-यांना पाडा असा पवित्रा जरांगे यांनी घेतला होता. या विधानसभा निवडणुकीत खरोखरच जरांगे फॅक्टर चालला की नाही यााठी आता शनिवारपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.