Amit Shah On Why Shivsena And NCP Split: भारतीय जनता पार्टीने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आपल्या जाहीरनाम्याचं प्रकाशन केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सचिव विनोद तावडेंसहीत अन्य नेत्यांच्या उपस्थित होते. शेतकरी, रोजगार, शिक्षण, गुंतवणूक, महिला या सारख्या वेगवेगळ्या घटकांचा समावेश असलेलं संकल्पपत्र जाहीर करण्यात आलं. जाहीरनामा जाहीर झाल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्री अमित शाहांना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना अमित शाह यांनी दोन्ही पक्षांमध्ये फूट पडण्यासाठी भाजपा जबाबदार नसल्याचं सांगतानाच हे पक्ष काय केलं असतं तर फुटले नसते याबद्दल भाष्य केलं.
पत्रकार परिषदेमध्ये शेवटून दुसरा प्रश्न हा शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील फुटीसंदर्भात विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना अमित शाहांनी, "शरद पवार यांनी सुप्रिया सुळेंऐवजी अजित पवारांची नेता म्हणून निवड केली असती तर पक्ष तुटला असता का? उद्धव ठाकरेंनीही आपल्या मुलाऐवजी एकनाथ शिंदेंना प्राधान्य दिलं असतं तर पक्ष तुटला असता का? आपल्या कुटुंबाला प्राधान्य देण्याच्या नादात या लोकांनी स्वत: आपले पक्ष फोडले आहेत आणि आता आम्हाला दोष देत आहेत," असं म्हटलं.
अमित शाह एवढ्यावरच न थांबता या पक्षांमध्ये भविष्यात पडणारी फूट थांबवायची असेल तर काय करावं लागेल याबद्दलही भाष्य केलं. "त्यांना पक्षामध्ये कधी ना कधी सर्वांना संधी देण्याचं धोरण तयार करावं लागणार आहे. नाहीतर त्यांचे पक्ष अधिक तुटत जातील," असं सूचक विधान अमित शाहांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीसंदर्भात बोलताना केलं.
नक्की वाचा >> संपला विषय! राज्याचा पुढचा CM कोण? अमित शाह हसतच म्हणाले, 'सध्या महाराष्ट्रात...'
लाडकी बहीणसारख्या योजना राबवण्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना अमित शाहांनी, "पहिले अडीच वर्ष उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात जे सरकार चालवण्यात आलं त्यामुळे एक खड्डा निर्माण झाला. त्यातून बाहेर काढण्यासाठी एक सपोर्ट देण्याची गरज होती. लाडकी बहीण योजना हा आमच्या बजेटचा विवेपूर्ण पद्धतीने केलेला वापर आहे. विकास, वीज, सिंचन, शिक्षण, मूलभूत सुविधा या गोष्टी सोडून जी आश्वासने दिली जातात त्यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पावर परिणाम होतो. गरीब कल्याणासाठी वापरला जाणारा निधी त्याचा राज्याला फायदा होतो. कारण अखेरीस अनेक व्यक्ती मिळूनच राज्य तयार होतं," असं अमित शाह म्हणाले.