सुप्रिया सुळेंना 'मोठ्या ताई' का म्हणता? चित्रा वाघ यांनी केला उलगडा, म्हणाल्या 'मोठ्या साहेबाची...'

Chitra Wagh on Supriya Sule: भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंवर (Supriya Sule) जोरदार हल्लाबोल केला आहे. चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी 'झी 24 तास'च्या निवडणूक विशेष 'जाहीर सभे'त हजेरी लावली. यावेळी त्यांनी आपण सुप्रिया सुळेंना 'मोठ्या ताई' का म्हणतो यामागील कारणही सांगितलं.   

शिवराज यादव | Updated: Oct 23, 2024, 07:52 PM IST
सुप्रिया सुळेंना 'मोठ्या ताई' का म्हणता? चित्रा वाघ यांनी केला उलगडा, म्हणाल्या 'मोठ्या साहेबाची...' title=

Chitra Wagh on Supriya Sule: भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंवर (Supriya Sule) जोरदार हल्लाबोल केला आहे. चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी 'झी 24 तास'च्या निवडणूक विशेष 'जाहीर सभे'त हजेरी लावली. यावेळी त्यांनी आपण सुप्रिया सुळेंना 'मोठ्या ताई' का म्हणतो यामागील कारणही सांगितलं. 

चित्रा वाघ यांना आक्रमकपणे टीका करण्याबद्दल विचारण्यात आलं असता त्या म्हणाल्या की, "मला चिड येते. मी यांची दोन्ही रुपं पाहिलेली आहेत. मी यांच्यासोबत काम केलं आहे. त्यावेळची त्यांची महिलांबाबती भूमिका पाहिली आहे. 2014 ते 2019 मध्ये एकही दिवस नसेल जेव्हा आम्ही मुख्यमंत्री कार्यालयाला टॅग करुन टीका केली नाही, महिलांसाठी भांडत राहिलो, प्रत्येक छोटा मुद्दा मांडत राहिलो. सुप्रिया सुळे त्यावेळी आमच्यासोबत होत्या. मी पक्ष सोडला आणि त्यानंतर त्या सत्तेत आल्या. मग महिला अत्याचार, प्रश्नावर घसाफोड करणारी नेता नंतर कशी काय गप्प बसू शकते हा माझा प्रश्न आहे". 

पुढे त्या म्हणाल्या की, "खोटेपणा समोर आला की मग उफाळून येतं. हा दुतोंडीपणा, चेहऱ्यावर चढवलेले चेहरे समोर येण्याची गरज आहे. एकीकडे तुम्ही महिलांचा कळवळा दाखवता आणि दुसरीकडे कसं वागता याचे  अनेक किस्से माझ्याकडे आहेत. खरा चेहरा लोकांसमोर आणण्याचा माझा प्रयत्न आहे". 

सुप्रिया सुळेंबद्दल पोस्ट करताना 'मोठ्या ताई' असा उल्लेख करण्याबद्दल विचारलं असता त्यांनी सांगितलं की, "त्या मोठ्याच आहेत ना. त्याच्यात दुमत असण्याचं कारण नाही. त्या मोठ्या साहेबांची मोठी पोरगी आहेत. त्यामुळे मी ओ मोठ्या ताई म्हणते. त्या किंवा त्यांच्या बरोबरचे मला हवं ते म्हणत असतात. जे चुकतं ते मोठ्या ताईलाही कधीतरी सांगावं लागतं, ते काम मी करते". 

तुम्हाला भिती वाटत नाही का? असं विचारलं असता त्या म्हणाल्या, "मी तर कोणाच्या बापाला घाबरत नाही. मी जे सांगतेय ते खोटं आहे किंवा चुकीचं आहे ते सांगा. मी उदारहणासह पटवून देऊ शकते. चेहऱ्यावर चेहरे चढवून, सोज्वळतेचा आव आणून मी कैवारी आहे असं दाखवलं जातं जे खोटं आहे त्याची मला चिड आहे". 

"मी कधी कोणाच्या वैयक्तिक आयुष्यावर लिहिलेलं नाही. पण मला सगळं खरं माहिती आहे. मला जे करतत ते ढोंग पटत नाही त्यामुळे ते आतून निघतं. त्यांना त्यांची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. पण त्या बोलतात ते खोटं आहे हे मला सांगायचं असतं. एका घटनेत त्यांनी मी पोलीस अधिक्षकांशी बोलले आहे असं सांगितलं. पण मग जे अधिक्षकांनी सांगितलं ते ट्विटमध्ये लिहायला हवं होतं. एखादी घटना आणखी रंगीत करुन दाखायची आणि फडणवीसांचा राजीनामा मागायचा. त्यांनी जे सांगितलं ते का लिहिलं नाही. मग त्यांना त्यांची भूमिका नको का दाखवून द्यायला?", अशी विचारणाही यावेळी त्यांनी केली.