Aditya Thackeray on Raj Thackeray: महाराष्ट्रात जो चिखल झालाय, त्या सर्वाचे कारण उद्धव ठाकरेच (Uddhav Thackeray) आहेत अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) झी 24 तासला दिलेल्या 'टू द पॉईंट' मुलाखतीत केली आहे. यावर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) व्यक्त झाले असून मनसे आता गुजरातच्या भुमिपूत्रांसाठी लढत आहे असा टोला लगावला आहे. ज्यांनी महाराष्ट्रातील राजकारण घाणेरडं, गलिच्छ, गढूळ केलं आहे. जो पक्ष भाजपाला पाठिंबा देत आहे, तो महाराष्ट्राला मागे नेण्याचं काम करत आहे असंही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरेंच्या व्यक्तिगत महत्वकांक्षेतून हे झालं. मला स्वत:ला मुख्यमंत्री व्हायचंय यासाठी भाजपशी सौदा गेला. व्यक्तिगत नसतं तर तेव्हाच एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं असतं. मोदी, अमित शहा वेगवेगळ्या सभेत आमचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे सांगत होते, त्यावेळी का आक्षेप घेतला नाही? अशी विचारणा राज ठाकरेंनी केली. तसंट महाराष्ट्रात आज जो चिखल झाला आहे त्यासाठी उद्दव ठाकरेच जबाबदार आहेत असंही म्हटलं.
महाराष्ट्रात जो चिखल झालाय, त्या सर्वाचे कारण उद्धव ठाकरेच आहेत. सुरुवातीला तुम्ही शरद पवारांशी बोलायला सुरुवात केली. अजित पवारांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणार तुरुंगात टाकणार होते, त्यांच्यासोबत तुम्ही शपथविधी करता. इतक्या स्वार्थाने तुम्ही विचारप्रणालीला मागे सारले. लोकांनी मत दिले त्याला लाथाडले. याची जर महाराष्ट्राला चटक लागली तर राजकारण कुठे जाईल? उद्या या गोष्टी वाढल्या तर कोण राहीलं इथे? अशी भिती राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे.
राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, "एकमेकांच्या वतीने भाजपा आणि मनसेने बोलू नये. मी त्याच्यावर वैयक्तिक कधी बोलत नाही. पण भीतीदायक बाब म्हणजे जी मनसे महाराष्ट्रातील भुमीपूत्रांसाठी लढत आहे असं वाटायचं ती आता गुजरातच्या भुमिपूत्रांसाठी लढू लागली आहे. ज्या मोदी साहेबांनी महाराष्ट्रातून मोठे उद्योग गुजरातला नेले, महाराष्ट्रातील तरुणांच्या नोकऱ्या गुजरातला नेल्या त्याच मोदी साहेबांना मनसेने बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यांनी भाजपाला पाठिंबा दिला आहे, ज्यांनी महाराष्ट्रातील राजकारण घाणेरडं, गलिच्छ, गढूळ केलं आहे. जो पक्ष भाजपाला पाठिंबा देत आहे, तो महाराष्ट्राला मागे नेण्याचं काम करत आहे".