मुंबई : नेवासा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत विजयी उमेदवार शंकरराव गडाख यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर दिलाय. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेऊन त्यांना पाठिंब्याचं पत्र दिलं. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न शिवसेना सोडवेल अशी अपेक्षा असल्यानं शिवसेनेसोबत जात असल्याचं शंकरराव गडाख यांनी म्हटलंय. आता पर्यंत ५ अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ ६१ वर पोहचलंय.
शिवसेनेचे सचिव मिलींद नार्वेकर यांनी सोमवारी नेवासा मतदारसंघाचे आमदार शंकरराव गडाख यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी शंकरराव गडाख यांचे वडिल यशवंतराव गडाख आणि बंधू प्रशांत गडाख देखील उपस्थित होते. शंकरराव गडाख यांनी शिवसेनेला अधिकृत पाठिंबा देत असल्याचं पत्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलं.
नाशिक पूर्व मधील माजी भाजपा आमदार बाळासाहेब सानप यांनी देखील रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकारे यांच्याहस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना भाजपाने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडणूक लढवली होती. परंतु भाजपच्या राहूल ढिकले यांनी त्याचा पराभव केला होता. आता ते राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेत. नाशिकच्या पालिका राजकारणात सानप यांचा भाजपविरोधात उपयोग होईल यादृष्टीनं त्यांना सेनेत आणलं असलं तरी स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांचा त्यांना विरोध आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशावेळी नाशिकमधील सेनेचा एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता.