Maharashtra Weather Forecast : राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

राज्यात मुसळधार पाऊस,  मुंबईसह ठाण्यात 12 सप्टेंबरपासून वाढणार पावसाची तिव्रता  

Updated: Sep 11, 2022, 08:22 AM IST
Maharashtra Weather Forecast : राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस title=

मुंबई : Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पाऊस सक्रीय झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु आहे. (Maharashtra Rain Update) हवामान खात्याने (Imd) दिलेल्या माहितीनुसार राज्यात  4-5 दिवसांमध्ये मान्सून सक्रीय राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून (Imd) देण्यात आला आहे.  ठाण्यात देखील मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. महत्त्वाचं म्हणजे मुंबईसह ठाण्यात (Mumbai Thane) पावसाची तीव्रता 12 सप्टेंबरपासून वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. 

मुसळधार पावसामुळे ठाणे जिल्ह्यातल्या उल्हासनगरमधील अनेक रस्ते पाण्याखाली गेले. गोलमैदान, सेंट्रल हॉस्पिटल रोड रस्त्याला नदीचं स्वरुप आलं. कॅम्प नंबर 2 च्या सेंट्रल हॉस्पिटलकडील रस्ता पूर्णपणे जलमय झाला. अनेक वाहनं पाण्यात बुडाली. दीड ते दोन तास पावसाचा जोर होता. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी पोलिसांनी बंद केला. 

बीड जिल्ह्यात काही दिवसांपासून तुफान पाऊस होतोय. शेतीचं अतोनात नुकसान झालंय. पाण्याचा निचरा होत नाहीये, उभी पिकं धोक्यात आलीयेत. त्यामुळे तातडीनं पंचनामे करायची मागणी शेतकऱ्यांनी केलीय. पावसानं दडी मारली होती पण दोन दिवसातल्या तुफान पावसामुळे शेतात पाण्याची अक्षरश: डबकी तयार झाली आहेत. पंचनामे करायची मागणी शेतकरी करतायत. 

पुणे जिल्ह्यातील भोर परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे शहरातील रस्त्यांना नदीचे स्वरूप आलय. तर काहींच्या घरातही पाणी शिरलंय.पावसामुळे शेतीचही मोठं नुकसान झालय. शहर आणि ग्रामीण भागात पाऊस पडत असल्यामुळे नागरिकांची ताराबळ उडली.

अतिवृष्टीग्रस्तांना राज्य सरकारनं मोठा दिलासा दिलाय. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांच्या मदतीसाठी 3 हजार 501 कोटी रुपये जिल्ह्यांना सुपूर्द करण्यात आलेत.. राज्य सरकारनं वाढीव मदतीसाठीचा जीआर काढलाय..