धाराशिवमध्ये 250 कोटींचा भूखंड घोटाळा, कुणी खाल्लं बाजार समितीच्या भूखंडाचं श्रीखंड?

धाराशिव जिल्ह्यातील कळंब कृषी उप्तन्न बाजार समितीत कोट्यवधींचा भूखंड घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. विशेष म्हणजे हा घोटाळा दुस-या तिसऱ्या कुणी नाही तर संचालक मंडळ, प्रशासक आणि अधिका-यांनी संगनमतानं केलाय.   

Updated: Mar 17, 2023, 08:31 PM IST
धाराशिवमध्ये 250 कोटींचा भूखंड घोटाळा, कुणी खाल्लं बाजार समितीच्या भूखंडाचं श्रीखंड? title=

ज्ञानेश्वर पतंगे झी मीडिया, धाराशीव : धाराशिव जिल्ह्यातील (Dharashiv) कळंब कृषी उत्पन्न बाजार समिती (Kalamba Agricultural Produce Market Committee) सर्वात मोठी बाजार समिती म्हणून ओळखली जाते. याच बाजार समितीत भूमाफियांनी (Land Mafias) आपलं उखळ पांढरं केलंय. या भूमाफियांनी एक दोन नव्हे तर तब्बल 600 प्लॉट्स लाटलेत. हे प्लॉट विकताना ना पणन संचालकांची परवानगी घेण्यात आली ना कुठल्या नियमांचं पालन करण्यात आलं. संचालक मंडळ, प्रशासक आणि अधिकाऱ्यांच्या खाबूगिरीमुळे सरकारला अडीचशे ती तीनशे कोटी रूपयांचा चुना लागलाय. चौकशी समितीच्या (Inquiry Committee) अहवालातून हा घोटाळा उघड झालाय. 

भूमाफियांची मोडस ऑपरेंडी
कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मालिकीची 7 एकर 38 गुंठे जमीन आहे. संचालक मंडळ, प्रशासक आणि अधिकाऱ्यांनी या जमिनीचे 600 प्लॉट केले. या प्लॉटची विक्री करताना पणन संचालकांची परवानगी घेणं आवश्यक होतं. मात्र तशी कोणतीही परवानगी न घेता, अनामत रक्कम न घेता हे प्लॉट खिरापतीसारखे वाटण्यात आले. यावर कळस म्हणजे पणन संचालकांनी बनवलेल्या लेआऊटमध्ये छेडछाड करून ओपन स्पेस (Open Space) आणि रस्त्याच्या जागेवरही प्लॉट तयार करण्यात आले. त्यांचीही विक्री करण्यात आली. या प्लॉट्सचा बाजारभाव जवळपास 250 ते 300 कोटी रूपये इतकं आहे. 

माजी सैनिक निवृत्ती हुलुळे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर सहनिबंधक बालाजी कटकधोंड यांनी चौकशी करून सरकारकडे अहवाल सादर केलाय. मात्र अहवालानुसार दोषींवर कारवाई करणं तर दूरच उलट तक्रारदारांनाच त्रास दिला जातोय. चौकशी अहवालात घोटोळाबाज संचालकांवर कारवाई करण्याची शिफारस करण्यात आलीय. मात्र निगरगट्ट यंत्रणा मूग गिळून गप्प आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेडने (Sambhaji Brigade) कोर्टाची पायरी चढण्याचा इशारा दिलाय. 

 झी 24 तासनं याबाबत अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता संपाचं कारण देऊन त्यांनीही हात वर केलेत. खरं तर बाजार समितीच्या जागेवर कृषी संबंधित दुकानं, गुरांचा बाजार, शेतक-यांसाठी रेस्ट हाऊस, भुसार बाजार होणं अपेक्षित आहे. मात्र हे सर्व सोडून या जागेचा वापर केवळ आणि केवळ शासकीय मलिदा लाटण्यासाठीच केला जाणं ही अत्यंत शरमेची बाब आहे. त्यामुळे दोषींवर कडक कारवाईची गरज आहे. 

भूखंडाचं लोणी खाणारे माफिया आजही राजरोसपणे मोकाट फिरतायेय. त्यांना ना कायद्याचा धाक आहे ना कारवाईची भीती. त्यामुळे या सगळ्या घोटाळ्यात बड्या धेंडांचा हात तर नाही ना असा सवाल उपस्थित होतोय.