महाड इमारत दुर्घटना : बिल्डरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

अद्यापही इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती 

Updated: Aug 25, 2020, 08:56 AM IST
महाड इमारत दुर्घटना : बिल्डरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल  title=
छाया सौजन्य- एएनआय

रायगड : सोमवारी सायंकाळच्या सुमारास Mahad  महाड शहरात पाच मजली इमारत कोसळल्याची घटना घडली. अतिशय भीषण अशा या दुर्घटनेमध्ये इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती वर्तवण्यात आली. दुर्घटनेचं एकंदर स्वरुप पाहता घटनास्थळी तातडीनं बचावकार्यास सुरुवात करण्यात आली. या दुर्घटनेप्रकरणी इमारतीच्या दोन्ही बिल्डरच्या नावे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

फारुक काझी आणि युनूस शेख या दोन्ही बिल्डरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिल्डरव्यतिरिक्त महाड शहर पोलीस स्थानकात आर्किटेक्टवरही गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. आठ महिने ते एका वर्षाच्या आतच या इमारतीचं बांधकाम पूर्ण झालं होतं. मुळात हे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचं होतं अशीच माहिती समोर येत आहे. त्यामुळं हा मनुष्यवधच आहे अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली आहे. सुरुवातीपासूनच इमारतीच्या बांधकामाच्या तक्रारी असल्याची धक्कादायक माहिती स्थानिक आणि प्रत्यक्षदर्शी तसंच इमारतीत दुर्घटनेतून बचावलेल्या रहिवाशांनी दिली. 

दरम्यान, महाडमधील काजळपूरा भागात असलेल्या तारीक गार्डन असं या इमारतीचं नाव आहे. या पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं ही इमारत कोसळल्यानंतर परिसरात एकच हाहाकार माजल्याचं पाहायला मिळालं. या दुर्घटनेनंतर ढिगाऱ्याखालून जवळपास ६० जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. असं असलं तरीही आठजण गंभीर जखमी असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

 

सध्याच्या घडीला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा घटनास्थळी दाखल झाले असून, ते सातत्यानं बचाव कार्याचा आढावा घेत आहेत. घटनास्थळी असणारा ढिगारा उचलण्यासाठी या ठिकाणी सहा ते सात जेसीबी दाखल झाले आहेत. शिवाय एनडीआरएफच्या ३ टीमही घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. प्रशासन आणि सर्व यंत्रणांच्या योगदानानं घटनास्थळी बचावकार्यास वेग आला आहे.