राज्यातील 48 लोकसभा मतदार संघासाठी किती शाईच्या बाटल्यांची तरतूद? जाणून घ्या

Loksabha Election:  प्रत्येक मतदार केंद्रासाठी प्रत्येकी २ शाईच्या बाटल्या याप्रमाणे 1 लाख 96 हजार 228 शाईच्या बाटल्यांची संख्या होते.

Updated: Apr 12, 2024, 07:58 PM IST
राज्यातील 48 लोकसभा मतदार संघासाठी किती शाईच्या बाटल्यांची तरतूद? जाणून घ्या title=
ink bottles for Voting

देवेंद्र कोल्हटकर, झी 24 तास, मुंबई: राज्यभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. उमेदवार सज्ज झाले आहेत. मतदार जागृक झाले आहेत. तसेच निवडणूक आयोगदेखील जोरात तयारील लागले आहे. दरम्यान बोटाला लावण्यात येणाऱ्या शाईसंदर्भात अपडेट समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी महाराष्ट्रात सुमारे 2 लाख 15 हजार 850 शाईच्या बाटल्या लागणार आहेत. या शाईचे वाटप जिल्हानिहाय करण्यात आले आहे. राज्यातील 48 लोकसभा मतदार संघांमध्ये 98 हजार 114 मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदार केंद्रासाठी प्रत्येकी २ शाईच्या बाटल्या याप्रमाणे 1 लाख 96 हजार 228 शाईच्या बाटल्यांची संख्या होते. याशिवाय 1 लाख 96 हजार 228 शाईच्या बाटल्यांबरोबरच 10 टक्के अधिक अशा एकूण 2 लाख 15 हजार 850 शाईच्या बाटल्या त्याचबरोबर मतदानासाठी आवश्यक ते साहित्य येत्या काही दिवसात पोहोच करण्यासाठी निवडणूक यंत्रणेमार्फत प्रयत्न सुरु आहेत.

म्हैसूर पेंटस् कंपनीत उत्पादन

या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांकरिता राज्यातील 48 मतदारसंघांमध्ये 9 कोटी 24 लाख 91 हजार 806मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या मतदारांच्या डाव्या तर्जनीवर शाई लावण्याकरिता निवडणूक आयोगामार्फत सुमारे 2 लाख 15 हजार 850 शाईच्या बाटल्याची मागणी नोंदविण्यात आली आहे. या सर्व बाटल्या राज्याला प्राप्त झाल्या असून सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. मतदारांच्या तर्जनीवर लावण्यात येणारी आणि काही दिवस न पुसली जाणारी ही शाई म्हैसूर पेंटस् कंपनीमार्फत बनवली जाते.

लोकशाही मजबूत करणारी काळी रेष

मतदानाचा हक्क बजावल्याची खूण म्हणून सर्वसामान्य असो की लोकप्रतिनिधी अथवा सेलिब्रिटींकडून शाई लावलेल्या डाव्या हाताची तर्जनी अभिमानाने दाखविली जाते. लोकशाही मजबूत करणारी ही काळी रेष निवडणुकांचा अविभाज्य घटक बनली आहे.

कशी असते प्रक्रिया?

मतदान केंद्रावर मतदाराची ओळख पटविल्यानंतर त्याला प्रवेश दिला जातो. प्रत्यक्ष मतदानापूर्वीच मतदाराच्या डाव्या तर्जनीवर न पुसली जाणारी शाई लावली जाते. त्यानंतर मतदाराची स्वाक्षरी किंवा अंगठा घेतला जातो. मतदानापूर्वी मतदान केंद्राध्यक्ष (पोलींग ऑफीसर) मतदाराच्या डाव्या तर्जनीवर शाई लावलेली आहे की नाही याची तपासणी करतात. जी व्यक्ती डाव्या तर्जनीची तपासणी करु देत नाही ते मतदानासाठी अपात्र असल्याचे मतदान अधिकारी सांगू शकतात. जर एखाद्या मतदाराला डाव्या हाताची तर्जनी नसेल तर त्या व्यक्तीच्या डाव्या हातावरील कोणत्याही बोटाला शाई लावली जाते.